राज्यात सध्या अनेक ठिकाणी परतीच्या पावासने थैमान घातलं असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता टोला लगावला आहे. आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट असं म्हणत त्यांनी उपहासात्मक ट्विट केलं आहे. “नगराचे राजे ‘बॉलिवूड’ कसे वाचवायचे यावर चिंतातूर झालेत,” अशी टीका त्यांनी केली आहे.

आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, “आटपाट नगरातील अहंकारी राजा आणि विलासी पुत्राची ही गोष्ट. महाराष्ट्र नावाच्या समृद्ध राज्यात करोनासोबत पावसाने थैमान घातलेले…शेती, घरे, गुरे, सारे काही उद्ध्वस्त..शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर अनावर. तेव्हा नगराचे राजे “बॉलिवूड” कसे वाचवायचे यावर चिंतातुर झालेले”.

आणखी वाचा- “…नाहीतर लोकांचा ‘ठाकरे’ नावावरील विश्वास उडेल”; मनसेने मुख्यमंत्र्यांना घातली साद

“मदतीसाठी राजा येत नाही म्हणून देवाचा धावा करणारी जनता आता मंदिरे तरी उघडा असा आर्जव करतेय. त्यावेळी नगरात कुणीही मागणी केली नसताना पब, बार, रेस्टॉरंट रात्री 11.30 पर्यंत खुले ठेवून नाईटलाईफची काळजी राजपुत्र करत आहेत. दुर्दैवी चित्र..महाराष्ट्र नगरी आणि चौपट राजा!,” असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- “…पण ‘खिसे गरम’ करायचं गणित…”; भाजपाने साधला कारावासाची शिक्षा झालेल्या ठाकूर यांच्यावर निशाणा

आणखी वाचा- जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन होणाऱ्या आरोपांना अजित पवारांनी दिलं उत्तर; म्हणाले…

“बॉलिवूडला संपवण्याचे किंवा इतरत्र हलवण्याचे जे प्रकार होऊ पाहत आहेत, ते कधीही सहन केले जाणार नाहीत,” असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी दिला. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बॉलिवूडमधील कलाकारांवर आरोप केले जात आहे. ड्रग्ज प्रकरणात अनेक कलाकारांची नावं घेतली जात आहे. बॉलिवूडमधील या वादावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मौन सोडलं. बॉलिवूडवर केल्या जात असलेल्या आरोपांवर दुःख व्यक्त करत उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशात होत असलेल्या फिल्मसिटीवरही भूमिका मांडली.