ग्रामपंचयात निवडणुकीत आपला पक्ष पहिल्या क्रमाकांचा ठरला असल्याचं माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. भाजपा नेत्यांकडून वारंवार कोकणात मिळालेल्या भरघोस यशाचा उल्लेख केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असतानाही रत्नागिरीत यश मिळालं नव्हतं, पण आता मोठं यश मिळालं असल्याचं म्हटलं आहे. तर भाजपा नेते आशिष शेलार यांनी ही महापालिकांमधील भाजपाच्या विजयाची पायाभरणी असल्याचं म्हटलं आहे.

आशिष शेलार यांनी व्हिडीओ ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाला अभुतपूर्व यश मिळालं आहे. कोकणातल्या जनतेने तर भरभरुन दिलं आहे. एकट्या सिंधुदूर्गात ४५ ग्रामपंचायतींमध्ये भाजपा जिंकली. २० ठिकाणीच शिवसेनेला यश मिळालं. राष्ट्रवादीला तर एखादं मिळालं ते नशीब. सिंधुदूर्गात भाजपा आणि रत्नागिरीत तर ५३६ च्या वर भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य निवडून आले. त्यामुळे जिलेबी फाफड्याचं राजकारण जे करु पाहत होते. नौटंकी करु पाहत होते त्यांना मालवणी खाजाने उत्तर दिलं”.

“सिंधुदूर्गात, रत्नागिरीत केवळ भाजपा याचा अर्थ आता मुंबई, ठाणे आणि मुंबई महापालिकांमध्ये भाजपाचा झेंडा लागेल. ही मुहूर्तमेढ झाली, भाजपाच्या विजयाची नांदी झाली,” असं म्हणत आशिष शेलार यांनी कोकणवासीयांचे धन्यवाद मानले. “नवी मुंबई, ठाणे आणि मुंबई महापालिकांमध्ये भाजपाच्या विजयाची ही पायाभरणीच आहे,” असंही ते म्हणाले आहेत.

याआधीही आशिष शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेला टोला लगावला. “कणकवली विधानसभा ३९ पैकी २७ तर सावंतवाडी १६ पैकी ९ तसेच कुडाळ १५ पैकी ९ अशा एकुण ७० पैकी भाजपाने ४५ ग्रामपंचायती जिंकल्या तर सेनेला केवळ २० आणि राष्ट्रवादीला १ ग्रामपंचायत जिंकता आली. सिंधुदुर्गात भाजपाचाच आवाज!कोकण म्हणजे “आम्हीच” म्हणणाऱ्यांचे कोकणी माणसाकडून गर्वहरण!,” असं त्यांनी म्हटलं.

“रत्नागिरीतील दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर तालुक्यातील 1492 उमेदवारांपैकी भाजपाचे 536 ग्रामपंचायत सदस्य विजयी झाले तर 59 गावात भाजपाचे सरपंच बसणार! रत्नागिरीतही घवघवीत यश! शिवसेनेचा आभासी फुगा फुटला कोकणात भगवा फडकला पण तो भाजपाचा,” असंही ट्विट त्यांनी केलं होतं.

फडणवीसांनी काय म्हटलं आहे –
“विदर्भात अभुतपूर्व यश आहेच, पण कोकणातदेखील चांगलं यश मिळालं आहे. खासकरुन सिंधुदूर्गात इतक्या चांगल्या प्रकारे म्हणजेच जवळपास ८० टक्के ग्रामपंचायती जिंकलो आहोत. राणे कुटुंब, रवींद्र चव्हाण तसंच तेथील कार्यकर्ते सर्वांनीच खूप मेहनत केली. सत्तेत असतानाही रत्नागिरीत यश मिळालं नव्हतं. पण आता मोठं यश मिळालं आहे. ठाणे, रायगडमध्येही यश मिळालं आहे. स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते लढवय्ये आहेत. एकूण जे वातावरण तयार होतंय, आम्ही सातत्याने लोकांना हे सरकार कशा पद्धतीने अन्याय करतंय हे समजावून सांगतोय त्याचा एक चांगला परिणाम झाला. तिघे एकत्रित येऊनही भाजपा पहिल्या क्रमांकाच पक्ष झाला आहे,” असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

“विदर्भात अभुतपूर्व यश आहेच, पण कोकणातदेखील चांगलं यश मिळालं आहे. खासकरुन सिंधुदूर्गात इतक्या चांगल्या प्रकारे म्हणजेच जवळपास ८० टक्के ग्रामपंचायती जिंकलो आहोत. राणे कुटुंब, रवींद्र चव्हाण तसंच तेथील कार्यकर्ते सर्वांनीच खूप मेहनत केली. सत्तेत असतानाही रत्नागिरीत यश मिळालं नव्हतं. पण आता मोठं यश मिळालं आहे. ठाणे, रायगडमध्येही यश मिळालं आहे. स्थानिक स्तरावरचे कार्यकर्ते लढवय्ये आहेत. एकूण जे वातावरण तयार होतंय, आम्ही सातत्याने लोकांना हे सरकार कशा पद्धतीने अन्याय करतंय हे समजावून सांगतोय त्याचा एक चांगला परिणाम झाला. तिघे एकत्रित येऊनही भाजपा पहिल्या क्रमांकाच पक्ष झाला आहे,” असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं.