उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा येथील मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान यावरुन भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. “महाराष्ट्र शासनाने अथवा मुख्यमंत्र्यांनी, अस्मितेचे धडे देणाऱ्या पत्रपंडितानी योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले ना या निर्णयाची साधी दखल घेतली,” अशी टीका करणारं ट्विट त्यांनी केलं आहे.

आशिष शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘ताजमहालच्या शेजारी उभारण्यात येणाऱ्या मुघल संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतला. त्यामुळे आग्राला महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाचा भगवा झेंडा फडकणार”. आशिष शेलार यांनी निर्णयाबद्दल योगी आदित्यनाथ यांचं अभिनंदन केलं आहे.

“खंत एवढीच..महाराष्ट्र शासनाने अथवा मुख्यमंत्र्यांनी, अस्मितेचे धडे देणाऱ्या पत्रपंडितानी योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले, ना या निर्णयाची साधी दखल घेतली. तशी अपेक्षा करणे चुकीचे म्हणा. इथे छत्रपतींच्या वंशजाकडे पुरावे मागितले जातात,तिथे अपेक्षा काय करावी?,” असा टोला आशिष शेलार यांनी यावेळी लगावला आहे.

 

योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी ट्विट करत सांगितलं होतं की, “गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात काहीही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळेच आता आग्रा येथे बांधण्यात येणारं हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाईल”.

 

आग्रा येथील ताजमहाल या वास्तूजवळ मुघल संग्रहालयाचं बांधकाम सुरु आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं सरकार होतं तेव्हाच या संग्रहालयाचं बांधकाम सुरु करण्यात आलं होतं. त्यानंतर या संग्रहालयाचं नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिलं गेल्याची महत्त्वाची घोषणा केली आहे.