वर्धा : जिल्हय़ातील सर्व जागा भाजपने लढवतानाच निष्ठावंतांनाच उमेदवारी दय़ावी, असा घोशा भाजपच्या कोअर समितीने पक्ष निरीक्षकांपुढे लावला.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज झाल्या. आमदार संजय केळकर (ठाणे) यांनी विश्रामगृहावर इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यापूर्वी जिल्हा कोअर समितीची बैठक झाली. खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, प्रदेश कार्यकारिणीचे सुधीर दिवे यांनी आपली मते या वेळी व्यक्त केली. जिल्हय़ात चार विधानसभा मतदारसंघ असून भाजपचे दोन आमदार आहेत. पक्षाने जिल्हय़ात खासदार तसेच सर्व नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर झेंडा फडकवला. सेनेला कुठेही स्थान नाही. उर्वरित दोन जागांवरसुद्धा यावेळी भाजपचाच आमदार निवडून येईल. जिल्हा शंभर टक्के भाजपमय करण्यासाठी भाजपनेच सर्व जागा लढवाव्यात, असे निरीक्षकांना सांगण्यात आले. जिल्हय़ात पक्ष मजबूत करण्यासाठी निष्ठावंतांनी श्रम वेचले आहे. पक्षाची ताकद असल्याने निष्ठावंतांनाच उमेदवारी मिळावी, असे एकमुखाने सांगण्यात आले.

सर्वाधिक इच्छुक उमेदवार देवळी मतदारसंघासाठी दिसून आले. माजी जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, जिल्हाध्यक्ष राजू बकाने, जि.प. नेते मिलिंद भेंडे, उद्योजक वैभव काशिकर, माजी खासदार सुरेश वाघमारे यांनी दावा केला. डॉ. गोडे यांनी गेल्यावेळी आपल्याला संधी नाकारण्यात आल्याचे नमूद करीत हा मतदारसंघ आपल्यासाठीच अनुकूल असल्याचा दावा केला. वैभव काशिकर यांनी युवकांना संधी देण्याचे मत मांडत शेतकरी, युवा वर्ग व उद्योजकांचे समर्थन असल्याचा युक्तिवाद केला. वर्धा मतदारसंघात आमदार डॉ. पंकज भोयर, सचिन अग्निहोत्री व श्रीमती वानखेडे यांनी दावा केला. गत पाच वर्षांत केलेली कामे व पक्ष बांधणीत दिलेले योगदान या आधारे आमदारांनी फेरसंधी मागितली. सामाजिक कार्याचा वसा असल्याने आपण विविध माध्यमातून सेवेचे व्रत सुरू ठेवले आहे. शेकडो उपक्रमातून जनतेच्या संपर्कात असल्याचे अग्निहोत्री यांनी सांगितले. आर्वी मतदारसंघात माजी आमदार दादाराव केचे, प्रदेश सदस्य सुधीर दिवे व युवकनेते राहुल ठाकरे यांनी मुलाखत दिली. या मतदारसंघातील विविध घटकातल्या ४३ हजार कुटूंबापर्यंत विविध  कार्यक्रमातून संपर्क साधल्याचे दिवे म्हणाले. दिवे प्रतिष्ठानच्या वर्षभर चालणाऱ्या नाना उपक्रमांचा फायदा जनतेला देण्याचे कार्य केल्याचे नमूद करीत दिवे यांनी आपण लढण्यास सर्वात सक्षम असल्याचा दावा केला. महिला बचतगट, युवा संत्री उत्पादक व सौर चरखा उपक्रम याद्वारे मतदारसंघाशी नेहमीच बांधीलकी दाखवल्याचे राहुल ठाकरे म्हणाले.

दिवसभर चाललेल्या या मुलाखतीत युवा उमेदवारांनी जोरदार दावा केल्याची चर्चा होती. सेनेसोबत युती न करण्याचा सूर प्रामुख्याने दिसून आला. हिंगणघाट मतदारसंघात विद्यमान आमदार समीर कुणावार यांचा एकटय़ाचाच दावा होता. याच मतदारसंघावर सेनेने दावा केला आहे. म्हणून निरीक्षकांशी चर्चा करताना चारही जागेवर उमेदवार उभे करण्याचे सुचवण्यात आले.