|| प्रदीप नणंदकर 

लातुरात नाटय़गृहाच्या नामांतराचा नवा वाद

लातूर : भाजपची दोन मते फोडून पालिकेत काँग्रेसने सत्ता मिळवली. अलीकडचीच ही राजकीय घडामोड. त्यानंतर काँग्रेसने भाजपावर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यामुळे आता पालिकेत भाजपा विरुध्द काँगेस, असा संघर्ष नाटय़गृहाच्या नामांतरावरून अधिकच टोकदार होताना दिसतो आहे.

भाजपाने शहरात बांधण्यात येणाऱ्या नाटय़गृह संकुलास भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत घेतला होता व त्यास मंजुरीही मिळाली होती. त्यातील एका दालनास लातूरचे सुपुत्र नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याचा ठराव पारीत झाला होता. सोमवारच्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी नाटय़गृह संकुलाला अटलबिहारी वाजपायी यांच्याऐवजी नटवर्य श्रीराम गोजमगुंडे असे नामकरण करण्याचा ठराव मंजूर केला. त्या पाश्र्वभूमीवर भाजपा आक्रमक झाली आहे.

या पार्श्वभूमीवर बुधवारी शासकीय विश्रामगृहावर भाजपाने तातडीने बठक बोलावली होती. या बठकीत गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव नाटय़गृहास देण्याचा पालिकेच्या ठरावाची प्रत दिली जाणार आहे. माजी पंतप्रधानांच्या नावाने सुरू होणाऱ्या नाटय़गृहाच्या नावात बदल करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे भाजपा सांगणार आहे. शुक्रवारी महापालिकेचे कामकाज चालू दिले जाणार नाही. २६ जानेवारी रोजी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या नागरी सत्काराला या मुद्यावरून विरोध करण्याचा निर्णय भाजपाच्या बठकीत घेण्यात आला असल्याचे भाजपचे शहर संघटन सचिव गुरुनाथ मगे यांनी सांगितले.

लातूर शहरातील नाटय़गृह हे या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ३ कोटी रुपयांची तरतूद या नाटय़गृहासाठी करण्यात आली होती. मात्र जागेवरून वाद निर्माण झाला व नाटय़गृहाचे कामकाज बासनात गुंडाळून ठेवावे लागले. महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपा सत्तेत आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी या कामाला गती दिली. ३ कोटींऐवजी २५ कोटी रुपयांची मंजुरी देऊन १५ कोटींचा निधी देऊन नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला या कामाचा प्रारंभही झाला आहे. शुभारंभास संभाजी पाटील निलंगेकर यांच्या समवेत आताचे पालकमंत्री अमित देशमुखही उपस्थित होते.

नाटय़गृहाच्या कामाने आता वेग घेतला आहे. १५ कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आली आहे. आता या कामाला आणखीन १० कोटी लागणार असून लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख हे योगायोगाने राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांनी या कामासाठी आíथक तरतूद करावी व त्यांच्या कारकिर्दीत हे नाटय़गृह सुरू व्हावे अशी अपेक्षा आहे. आता नाटय़गृहाचे बांधकाम सुरू झाल्यानंतर नावावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. हा वाद कसा सुटतो याकडे आता लक्ष लागले आहे.

वाजपेयी, ठाकरे, मुंडे यांच्या दालनास मंजुरी

सर्वसाधारण सभेत नाटय़गृहास नटवर्य श्रीराम गोजमगुंडे यांचे नाव देण्याची मागणी माजी महापौर दीपक सूळ, नगरसेवक राजा मणियार, अशोक गोिवदपूरकर यांनी केली. त्यानुसार सभेत ठराव घेण्यात आला. शिवाय अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने नाटय़गृह संकुलात स्वतंत्र दालन करण्यास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितले.

दंडेलशाही मोडून काढू

महापालिकेत सत्ताबदल केला म्हणजे आपली दंडेलशाही चालवता येईल असे कोणाला वाटत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही. नाटय़गृहासाठी निधी वाढवून देऊन तो प्रश्न मार्गी लावण्याचे काम आपण केले आहे. वाजपेयी यांच्या नावातील बदल भाजपचा कार्यकर्ता खपवून घेणार नाही. यासाठी पडेल ती किंमत द्यायला आपण तयार आहोत, असे माजीमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले.

जनआंदोलन उभारू

लातुरातील नाटय़गृहासाठी तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निधी मंजूर केला. वाजपेयी यांच्या नावाचा रीतसर ठराव घेतलेला असताना त्यात बदल करणे नतिकतेत बसत नाही. नूतन पालकमंत्र्यांना आमची भूमिका आम्ही सांगू व या प्रश्नासाठी लातूरच्या जनतेसोबत आपण आंदोलनात अग्रभागी राहू, असे औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.