“सोशल मीडियावर ८० हजार बनावट खाती उघडून त्या माध्यमातून अनेक गैरप्रकार केल्याचे अमेरिकेतील विद्यापीठाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न झाला. यामागे भाजपाचा हात असल्याचेही स्पष्ट झाले आहे.” असा आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला.

सोशल मीडियात देखील बनावट खाती उघडून केलेल्या गैरप्रकाराची चर्चा होत आहे. या विषयावर मुश्रीफ यांनी भाष्यं केले. ते म्हणाले, “देश – विदेशामध्ये असंख्य बनावट खाती सुरू करून त्या माध्यमातून घोटाळे करण्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे. ही बनावट खाती भाजपाकडून चालवली जात होती अशी माहिती पुढे आली आहे. मागील अकरा महिने भाजपाकडून ठाकरे परिवाराला बदनाम करणे, मुंबई पोलिसांना शिवीगाळ करणे यासारखे प्रकार या माध्यमातून केले गेले आहेत. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणातही याच माध्यमातून असाच प्रकार झाल्याचे आता दिसत आहे. याशिवाय, याच माध्यमातून जाहिरातीचे उत्पन्न मिळवण्यासाठी ‘टीआरपी’ वाढवण्याचा गैरप्रकारही पुढे आला आहे. चौकशीतून या सर्व गैरप्रकारावर प्रकाश पडेल.” असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

आणखी वाचा- भाजपाचा सीबीआयवरही विश्वास उरला नसेल तर काय बोलणार? – संजय राऊत

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा –
राज्य सहकारी बँकेच्या २५ हजार रुपयांच्या घोटाळा प्रकरणांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हसन मुश्रीफ हे ही संशयित आरोपी होते. न्यायालयाने दोघांनाही निर्दोष ठरवले आहे. या निकालावरून त्यांनी माजी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. ‘चंद्रकांत पाटील हे तीन वर्ष सहकारमंत्री होते. त्यांना ना सहकार विभागातले काही कळले ना महसूल विभागातील. राज्य बँकेचा घोटाळा नेमका काय होता? हे पाटील यांना समजले नाही. सहकारमंत्री पद भूषविलेल्या पाटील यांनी सहकाराचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे, असा टोला मुश्रीफ यांनी लगावला.