मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना उद्धव ठाकरे यांना राज्यातील भाजपा नेत्यांसोबतच मोदी सरकारवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत “शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे” असा टोला लगावला. दरम्यान उद्धव ठाकरे यांचं हे विधान भारतीय सैन्यांचं अपमान करणारं असल्याची टीका भाजपा नेत्यांनी केली आहे.

भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना राहुल गांधींवरही निशाणा साधला अशून उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत असा टोला लगावला आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “चीनसमोर पळ काढे असं निलाजरं विधान करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भारतीय सैनिकांचा अपमान केला. उद्धवजी हे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”.

भाजपाला भारतमाता की जय बोलण्याचा अधिकार नाही; RSSचा हवाला देत ठाकरेंची टीका

जवानांचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीदेखील अतुल भातखळकर यांनी केली आहे. जनता या ‘राहुल गांधीगिरी’चा समाचार घेईलच” असंही ते म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते –
“आपल्याकडच्या शेतकऱ्यांची काळजी घेतलीच पाहिजे. वीजेबद्दलचा निर्णय आपण कालच घेतला आहे. पण, जे शेतकरी तिकडे आंदोलन करत आहेत. त्यांची वीज कापली जाते. त्यांची शौचालये तोडली जात आहेत. पाणी बंद केलं जात आहे. इतकंच नाही, तर ते देशाच्या राजधानी येऊ नयेत म्हणून त्यांच्या वाटेत खिळे टाकले जात आहेत. ज्या तारांचं कुंपण सीमेवर असायला हवं ते त्यांच्या वाटेत टाकलं जातं. शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे. तिकडे काहीच नाही. हा बंदोबस्त सीमेवर केला असता, चीन देशाच्या हद्दीत घुसला नसता. शेतकरी अतिरेकी आहेत का? असं समजू नका की, देश ही तुमची खासगी मालमत्ता आहे. शेतकऱ्यांची सुद्धा मालमता आहे,” अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.