राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह प्रकरणावरुन विरोधकांवर निशाणा साधला असून महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अनिल देशमुख यांनी बदनामी करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही असंही म्हटलं. त्यांच्या या टीकेला भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी उत्तर दिलं आहे. “अनिल देशमुख महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर,” असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

अतुल भातखळकर यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “गृहमंत्री अनिल देशमुख हे राज्यात सुरू असलेल्या महाविकासआघाडी नावाच्या सर्कशीतले जोकर आहेत. याआधी भाजपा सरकारवर केलेले फोन टॅपिंगचे आरोप ते सिद्ध करू शकले नाहीत. आता सुशांतप्रकरणी त्यांनी बोगस अकाउंटचा आरोप केला आहे. आरोप सिद्ध करा नाही तर जनतेची माफी मागून तोंड काळे करा”.

“अनिल देशमुख यांनी नेहमीप्रमाणे भाजपावर खोटे राजकीय आरोप केले आहे. या खोट्या आरोपांबद्दल भाजपा तीव्र निषेध करते. जी चौकशी करायची आहे ती करा. भाजपा किंवा देवेंद्र फडणवीस कधीच आणि कोणतंही बेकायदेशीर काम करत नाहीत,” असंही यावेळी अतुल भातखळकर यांनीही म्हटलं आहे. “राज्याने इतके राजकीय गृहमंत्री इतिहासात कधीच पाहिलेले नाहीत,” अशीही टीकाही त्यांनी केली आहे.

अनिल देशमुख यांनी काय म्हटलं –
सुशांत प्रकरणाआड छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम केलं. महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी माफी मागावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. “एम्सचा रिपोर्ट जाहीर झाला आहे. कूपर आणि एम्सचा रिपोर्ट पाहिला तर त्यात कुठेही व्हिसेरामध्ये विषाचा अंश सापडला नाही. या संपूर्ण केसची चौकशी सीबीआयच्या माध्यमातू सुरु आहे. सीबीआयचा अंतिम रिपोर्ट येईल तेव्हा त्यात काय असेल याची सर्वजण वाट पाहत आहेत. लवकरात लवकर रिपोर्ट जाहीर करावा अशी आमची विनंती आहे. यामुळे सुशांतची हत्या होती की आत्महत्या हेदेखील स्पष्ट होईल,” असं यावेळी अनिल देशमुख यांनी म्हटलं.

“बिहारचे माजी डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र आणि मुंबईची बदनामी केली. ते आता बिहारमधून निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे बिहार प्रभारी देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या प्रचाराला जाणार का?,” असा प्रश्न अनिल देशमुख यांनी यावेळी विचारला. “महाराष्ट्र पोलिसांना माफिया म्हणण्यापर्यंत भाजपाच्या नेत्यांची मजल गेली होती,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

“ज्यांनी पाच वर्ष मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचं नेतृत्व केलं त्या देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने नव्हता असं म्हटलं होतं. संपूर्ण महाराष्ट्र करोनाविरोधात युद्ध लढत असताना महाराष्ट्राविरोधात षडयंत्र रचण्यात आलं. महाराष्ट्राला बदनाम करण्यात आलं. त्याच्याही पुढे जाऊन जे बाहेरचे आहेत पण महाराष्ट्रात वास्तव्य करत आहेत अशा बाहुलीलाही आपल्या तालावर नाचवण्याचं काम या पक्षाने केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र यानिमित्ताने बदनाम झाला आहे,” अशी टीका अनिल देशमुखांनी केली.