News Flash

“किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपतीपदाचा उमेदवार तरी बनवा”

प्रशांत किशोर यांच्या भेटींमुळे शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उभं केलं जाणार असल्याची चर्चा

प्रशांत किशोर यांच्या भेटींमुळे शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उभं केलं जाणार असल्याची चर्चा (File Photo: PTI)

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्यानंतर गांधी कुटुबीयांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान प्रशांत किशोर यांच्या भेटींमुळे शरद पवार यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून उभं केलं जाणार असल्याचीही चर्चा सुरु झाली होती. पण शरद पवार यांनीच खुलासा करत अद्याप काहीही ठरलं नसल्याचं सांगितलं आहे. मात्र राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडून विधानं होऊ लागल्यानंतर विरोधकांनी यावरुन टीका करण्यास सुरुवात केली होती.

भाजपाचे प्रवक्ते अतुल भातखळकर यांनीदेखील यानिमित्ताने शरद पवारांवर निशाणा साधला होता. टीव्ही ९ ला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी शरद पवारांनी पंतप्रधानपदाची महत्वाकांक्षा सोडलेली दिसते अशी टीका करताना हास्यास्पद हाचलाची सुरु असल्याचा टोला लगावला होता. निवडणुकीचा विचार केला तर लोकसभा, राज्यसभेत भाजपाचं बहुमत आहे, त्यामुळे भाजपाचाच उमेदवार निवडून येईल असंही ते म्हणाले आहेत. त्यांना फक्त यातून प्रसिद्धीची ऊर्जा मिळते, याशिवाय काही साध्य होणार नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान अतुल भातखळकर यांनी ट्वीट करताना किती दिवस भावी पंतप्रधान राहू, किमान राष्ट्रपती पदाचा उमेदवार तरी बनवा असा टोलाही लगावला आहे.

शरद पवारांकडून खंडन

शरद पवार यांनी खुलासा करत अद्याप काहीही ठरलेलं नसल्याचं सांगितलं आहे. तसंच मी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी उभा राहणार असल्याचं वृत्त पूर्णपणे खोटं असल्याचंही पवार म्हणालेत.

…म्हणून मी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही; पवारांचं सूचक वक्तव्य

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाकडे बहुमत असल्याचे स्पष्ट संकेत देत पवारांनी आपण उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार नसल्याचं सांगितलं आहे. “राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये मी उमदेवार असेल हे पूर्णपणे खोटं वृत्त आहे. एका पक्षाकडे ३०० हून अधिक खासदार असताना याचा (राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा) निकाल काय असणार आहे मला माहिती आहे. मी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार नसेन,” असं पवारांनी स्पष्ट केलं आहे.

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यासोबत झालेल्या बैठकींबद्दलही पवार यांनी खुलासा केलाय. प्रशांत किशोर यांनी दोन वेळा माझी भेट घेतली. मात्र त्यावेळी आम्ही केवळ त्यांच्या कंपनीबद्दल बोललो. २०२४ च्या निवडणुकींमध्ये किंवा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकींमध्ये नेतृत्व कोणाकडे असावं यासंदर्भात आमची चर्चा झाली नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं. तसेच प्रशांत किशोर यांनी आपण निवडणुकीच्या नियोजनासंदर्भातील क्षेत्र सोडल्याचंही मला सांगितल्याचं पवार म्हणाले.

निवडणुकींसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसल्याचंही पवारांनी सांगितलं. २०२४ ची निवडणूक असो किंवा राज्यामधील निवडणूक असून अद्याप कशासंदर्भात काहीही निर्णय झालेला नाही. निवडणूक अजून फार दूर आहे आणि राजकीय परिस्थिती बदलत राहते. २०२४ मध्ये नेतृत्व कोणाकडे असेल यासंदर्भात मी कोणतेही अंदाज बांधणार नाही, असं पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 10:45 am

Web Title: bjp atul bhatkhalkar on ncp sharad pawar over president election sgy 87
Next Stories
1 काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये धूसफूस; रावसाहेब दानवे म्हणतात, “महाविकास आघाडीचा जन्मच….”
2 “यापेक्षा जास्त मतं जिमखान्याच्या अध्यक्षाला मिळत असतील,” ‘लोकप्रिय मुख्यमंत्री’ ठरलेल्या ठाकरेंना भाजपा नेत्याचा टोला
3 “उठ-सूट सरकारवर टीका करणाऱ्या……”; रोहित पवारांनी भाजपाला सुनावले खडे बोल
Just Now!
X