पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. भाजपा तसंच इतर पक्षांनी हिंसाचारासाठी तृणमूल काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केला असताना तृणमूलने मात्र आरोप फेटाळले आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यात ११ कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप करत भाजपाने तृणमूलला लक्ष्य केले असताना हिंसाचारात आपल्या एका कार्यकर्त्यांचीही हत्या झाल्याचा आरोप तृणमूलने केला. दरम्यान यावरुन महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांनीही संताप व्यक्त केला आहे.

“पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यकर्ते मारले जात आहेत. कथित मानवतावादी, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी भामटे तोंड आवळून बसलेत. ममता बॅनर्जींच्या आरत्या ओवाळल्या जातायत,” असा संताप भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. “या हिंदूविरोधी राजकारणाचे आम्ही चोख उत्तर देऊ. जनता देईल. आणि लक्षात ठेवा तो दिवस फार दूर नाही,” असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

जे. पी. नड्डा बंगालमध्ये
हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा मंगळवारी बंगालमध्ये दाखल झाले. तृणमूल कॉंग्रेसच्या विजयानंतर राज्यात भाजपच्या कार्यकर्त्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागत असल्याचे जे. पी. नड्डा यांनी सांगितलं. बंगालमधील हिंसाचार हा देशाच्या फाळणीवेळच्या हिंसाचाराचे स्मरण करून देणारा असून, निवडणुकोत्तर काळात मी असा हिंसाचार कधी पाहिला नाही, असे नड्डा म्हणाले. तृणमूल काँग्रेस हा असहिष्णू पक्ष आहे. मात्र, लोकशाही मार्गाने विचारांची लढाई लढण्यास भाजप कटिबद्ध आहे, असे नड्डा यांनी सांगितलं.

भाजपा सर्वोच्च न्यायालयात
पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि बलात्काराच्या घटनांची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपा नेते गौरव भाटिया यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाकडे केली. हिंसाचार घडविणाऱ्यांवर काय कारवाई झाली, याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान-राज्यपाल चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपाल जगदीप धनकर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून पश्चिम बंगालमधील परिस्थितीचा आढावा घेतला. हिंसाचाराबद्दल मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे राज्यपालांनी सांगितले.