भाजपचा शिवसेनेला टोला; आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्याचा फडणवीस यांचा पक्ष आमदारांना सल्ला
महाधिवक्ता श्रीहरी अणे यांना हटविण्याच्या मागणीसाठी शिवसेना आक्रमक झाली असताना भाजपने मात्र शिवसेनेला टोला लगावला आहे. अणे यांनी बाजू मांडल्यानेच उच्च न्यायालयाने शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्यास परवानगी दिल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. शिवसेनेला रोखठोक प्रत्युत्तर देण्याची भूमिका भाजपने घेतली असून अणे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेसह विरोधी पक्षांनी अणे यांच्या वक्तव्यावरून तीव्र आक्षेप घेतले आहेत. शिवसेनेची निदर्शने झाल्यावर सरकारची भूमिका मांडताना तावडे यांनी अणे यांचे समर्थन केले. त्यांनी महाधिवक्ता म्हणून काम पाहताना महाराष्ट्राच्या हिताचीच भूमिका घेतली आहे. मराठवाडय़ाला पाणी मिळाले पाहिजे, अशी बाजू न्यायालयात मांडली आहे. त्याचबरोबर दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होण्यासाठी उच्च न्यायालयात अणे यांनीच बाजू मांडली होती, असे तावडे यांनी स्पष्ट केले.
महाधिवक्ता हे सरकारची भूमिका न्यायालयात मांडत असतात. दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा, अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस यांची होती. त्यानुसार सरकारच्या वतीने न्यायालयात शिवसेनेला पािठबा देण्यात आला. पण अणे यांच्याविरोधात शिवसेना आक्रमक असताना दसरा मेळाव्याचा उल्लेख करून भाजपने शिवसेनेला डिवचले आहे. त्यामुळे शिवसेनेकडूनही त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असे समजते.

भाजप आमदारांची बैठक
महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्यावरून निर्माण झालेला वाद आदी मुद्दय़ांवर आक्रमक झालेल्या विरोधकांना तितक्याच आक्रमकपणे प्रत्युत्तर देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना दिल्या.अधिवेशनात मंगळवारपासून सरकारला विरोधक धारेवर धरणार आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळग्रस्तांना मदत, अणे यांचे वक्तव्य आदी मुद्दय़ांवरून विरोधक आक्रमक होतील. या पाश्र्वभूमीवर भाजपची रणनीती ठरविण्यासाठी पक्षाच्या प्रभारी सरोज पांडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आदींच्या उपस्थितीत पक्षाच्या आमदारांची बठक झाली. विरोधकांचे हल्ले सुरू असताना भाजपच्या सदस्यांनी सभागृहात हजर राहून प्रत्युत्तरही द्यावे, असे सांगण्यात आले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जात असून पक्षपातळीवर समित्या नेमून त्यावर देखरेख ठेवली जाईल, त्याचबरोबर सरकारची कामे लोकांपर्यंत पोचविण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करावेत, असे प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी बठकीत सांगितले.