02 March 2021

News Flash

सांगलीत महाविकास आघाडीची संधी हुकली

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मंत्रिपद आणि खातेवाटपात मग्न

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मंत्रिपद आणि खातेवाटपात मग्न

सांगली : राज्यातील सत्तांतरानंतर जिल्हा परिषदेतही सत्तांतर होईल अशी भाबडी आशा काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला होती. मात्र दोन्ही काँग्रेसचे नेते मंत्रिपद आणि खातेवाटपात मश्गूल राहिल्याने चालून आलेली संधी हुकली. वरिष्ठ नेत्यांनीच कार्यकर्त्यांपेक्षा स्वहिताला प्राधान्य दिल्याने आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मात्र जिल्हा परिषदेच्या राजकारणात हिरमोड झाला. महाविकास आघाडीचे नेते सत्तेच्या खेळात मग्न राहणार हे ओळखून भाजपने मात्र संधी न दवडता जिल्हा परिषदेची सत्ता राखली.

तीन वर्षांपूर्वी भाजपने जिल्हा परिषदेची सत्ता शिवसेनेच्या मदतीने हस्तगत केली. त्या वेळी उपाध्यक्षपद सेनेला देऊन तडजोड करण्यात आली. ६० सदस्यांच्या जिल्हा परिषदेत भाजपचे संख्याबळ २७ आहे, तर एक जागा विक्रमसिंह चव्हाण आमदार झाल्याने रिक्त आहे. म्हणजे ५९ सदस्यांच्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी ३० हा जादूई आकडा आवश्यक होता. भाजपच्या बाजूला असलेली रयत विकास आघाडी आणि शिवसेनेचे तीन सदस्य जरी बोलणी करून महाविकास आघाडीत सहभागी करून घेतले असते, तर कदाचित वेगळे चित्र दिसले असते. मात्र वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाकांक्षा मुंबईतील सत्ताकारणाभोवती फिरत राहिली. त्यामुळे भाजपने सत्ता राखली.

या उलट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुरुवातीपासूनच मोच्रेबांधणी सुरू ठेवली. पहिला टप्पा म्हणून विधानसभेत बंडखोरी करून भाजपच्या पराभवाला कारणीभूत ठरलेल्या महाडिक बंधूंना भाजपमध्ये प्रवेश दिला. शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे तीन सदस्य जिल्हा परिषदेत आहेत. त्यांच्याशी एकीकडे बोलणी करीत असताना पर्यायी संख्याबळ जमविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र संख्याबळात भाजप यशस्वी ठरते आहे हे लक्षात येताच शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय घेतला.

झाले काय? : पदाधिकारी निवडीवरून भाजपमध्ये मतभेद होते. उपाध्यक्षपद मिळावे यासाठी खासदार गट आक्रमक होता. या गटाचे चार सदस्य बाजूलाच होते. भाजपमध्ये फूट पडेल आणि आपली सत्ता येईल अशा भ्रमात आघाडीचे नेते राहिले. मात्र भाजपने एक पाऊल मागे घेत असतानाच खासदारांची नाराजी समजून घेत त्यांनाही पक्षाचा निर्णय मान्य करण्यास भाग पाडले. पक्षाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे प्रदेश सचिव मकरंद देशपांडे यांनी खासदारांशी संवाद साधत असतानाच दुसऱ्या बाजूला महाडिक आणि बाबर यांच्याशी संवाद कायम ठेवला. अखेर संख्याबळापेक्षा पाच सदस्य अधिक घेऊन सत्ता राखली. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य गैरहजर ठेवून आपली ताकद वाढविण्यात यश मिळवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 4:35 am

Web Title: bjp beat maha vikas aghadi candidate in sangli district council polls zws 70
Next Stories
1 अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला
2 धुळ्यात भाजपची परीक्षा
3 नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक : सर्वच पक्षांमध्ये घराणेशाहीला खतपाणी
Just Now!
X