दिगंबर शिंदे

विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून पूरपरिस्थितीत मदतीचा हात देणारे, एकमेकांना आधार देण्यासाठी एकवटलेले आता आपापल्या पक्षाचा झेंडा हाती घेऊन मदान मारण्यासाठी रणांगणात उतरत आहेत. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि राष्ट्रवादीचा गड मानला गेलेल्या सांगली जिल्हय़ावर भगवा फडकवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपमध्ये इच्छुकांची मांदियाळी आणि उमेदवारीसाठी प्रचंड चुरस दिसत आहे. मात्र सहा महिन्यांपूर्वी लोकसभेवेळी घेतलेल्या आणाभाका महापुराच्या लोंढय़ात नि अलमट्टीच्या डोहात वाहून गेल्या असाव्यात, अशी रास्त शंका उमेदवारांच्या मुलाखतीवेळी निर्माण झाली.

महापुरानंतर सांगली सावरत असताना आता राजकीय पक्षांनी तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. महापुरानंतर पूरग्रस्तांना मदत करण्यात सर्व संघटना आणि शासन यंत्रणा गेले आठ-दहा दिवस गुंतल्या होत्या. आता सांगलीकरांना गणेशोत्सवाचे वेध लागले असतानाच राजकीय पक्षांचे कार्यकत्रे मात्र महापुरापेक्षा उत्सवाचे राजकीय भांडवल करण्यासाठी पुढे सरसावले असून पूरग्रस्तांना मदत करणे ही सर्वाचीच सामाजिक बांधलकी असल्याने याचा राजकीय लाभ मिळणे दुरापास्त असल्याने जो तो आता उत्सवाच्या माध्यमातून  राजकीय लाभ मिळविण्याच्या तयारीत दिसत आहे.

सत्ताधारी भाजपने इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम नुकताच आयोजित केला होता. अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर आणि प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे या दोघांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. इच्छुकांनी एकेकटय़ाने येऊन आपली भूमिका पक्ष निरीक्षकांसमोर मांडावी, शक्तिप्रदर्शन करू नये असे आदेश असतानाही शिराळा मतदारसंघातून सम्राट महाडिक यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारीची आग्रही मागणी केली. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, हे विशेष. तर सर्वाधिक इच्छुक जत विधानसभा मतदारसंघात असल्याचे यामुळे स्पष्ट झाले. तर खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांनीही तासगाव-कवठेमहांकाळमधून उमेदवारी मागितली असून, सांगलीत मिस्टर क्लीन आणि उपद्रवशून्य आमदार अशी ओळख असलेल्या सुधीर गाडगीळ यांच्या सांगली मतदारसंघात निष्ठावंत गटासह आयारामानींही उमेदवारी मागितली  आहे.

आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ पाहण्याची सवय असलेल्या माध्यमांना यंदा प्रथमच भाजपकडे इच्छुकांची गर्दी पाहण्यास मिळाली. म्हणजे एकाअर्थी भाजपचे काँग्रेसीकरण अवघ्या पाच वर्षांच्या आत झाल्याचे दिसले. एकेकाळी निवडणूक लढविणे एवढाच एकमेव हेतू समोर ठेवून मदानात उतरणारा भाजप आता संपूर्ण जिल्ह्य़ातील सर्व आठही जागा जिंकण्याच्या तयारीत असून यामध्ये महायुतीतील शिवसेनेसह अन्य घटक पक्षांना कितपत संधी देणार हाही महत्त्वाचा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

लोकसभा निवडणुकीवेळी भाजपमध्ये असलेली गटबाजी चव्हाटय़ावर येणार नाही, पक्षाच्या उमेदवाराला या गटबाजीचा फटका बसणार नाही, याची दक्षता प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली होती. पक्षांतर्गत नाराजीमुळे भाजप अडचणीत येणार नाही यासाठी सांधेजोड करण्याची आणि शब्द देऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे यांनी केला होता. यामध्ये महत्त्वाचा मुद्दा तासगाव-कवठेमहांकाळचा होता. खासदार पाटील यांनी कवठेमहांकाळमध्ये स्वतचा गट निर्माण करण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षांत केला होता.

लोकसभेच्यावेळी या गटबाजीवर उपाय काढीत असताना पालकमंत्री सुभाष देशमुख आणि देशपांडे यांनी विधानसभेसाठी केवळ घोरपडे सरकार हा नारा देत दिलजमाई घडवून आणली होती. काकांनीही तडजोड मान्य केली होती. मात्र अग्रणीच्या पाण्यात ही दिलजमाई वाहून गेली की काय अशी शंका आता येऊ लागली आहे. तासगावच्या कापूर ओढय़ातील रुंदी जशी कमी होत आहे, तशी राजकीय मत्रीच्या सीमा मात्र रुंदावत असल्याचे दिसत आहे.

खासदार संजयकाका पाटील यांच्या पत्नी ज्योती पाटील यांनी तासगाव-कवठे महांकाळमधून उमेदवारीची मागणी केली आहे. पक्ष शिस्त म्हणून त्यांच्या मागणीला डावललेही जाईल, मात्र यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना पुन्हा सांधण्यासाठी आणि त्यांना पक्षाच्या मागे उभे करण्यात काका जोमाने प्रयत्न करतील का, हा खरा प्रश्न आहे. मतदार संघावर कवठय़ाऐवजी तासगावचेच वर्चस्व राहावे अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका असली, तरी त्याला आवर घालण्याची जबाबदारी खासदारांवर आहे. यात पक्ष कितपत यशस्वी होतो यावर पुढील राजकीय मांडणी अवलंबून आहे.

सांगलीमध्ये माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य शिवाजी तथा पप्पू डोंगरे, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर आणि नगरसेवक शेखर इनामदार यांनीही उमेदवारी मागितली आहे. तर जतमध्ये जिल्हा परिषदेतील सभापती तमणगोंडा रवि पाटील, डॉ. रवींद्र आरळी, प्रकाश जमदाडे आदींसह विद्यमान आमदार विलासराव जगताप यांना विरोध करीत उमेदवारीची मागणी केली आहे. शिराळ्यात शिवाजीराव नाईक अडचणीत असल्याने काँग्रेसचे सरचिटणीस सत्यजीत देशमुख यांच्यासाठी पायघडय़ा घालण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू असताना पेठ नाक्यावरील महाडिक गटाने मदानात उतरण्याची तयारीही सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही काँग्रेसला आव्हान देण्यापूर्वी पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्याचे आव्हान भाजपपुढे असेल असे सध्याचे चित्र आहे. त्याचबरोबर मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला भाजप काय देणार हाही प्रश्न आहेच. जागा सोडण्याबरोबरच उमेदवारही देण्याचा पालघर आणि साताऱ्याप्रमाणे भाजपचा प्रयत्न राहील, असे दिसते.