हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मराठा संघटनांनी पुन्हा एकदा मुंबईत आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये म्हणून आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच पोलिसांकडून सोमवारी रोखण्यात आलं. सकाळपासूनच मुलुंड आणि मानखुर्द येथे पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. दरम्यान यावेळी एका बसवरील भगवा झेंडा काढण्यात आल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भगवा काढून बस रवाना केली…धक्कादायक! हे कोणत्या प्रकारचं राजकारण करत आहे सरकार…उद्धवजी आणि पवार साहेब दोघांनाही याचं उत्तर द्यावं लागेल! काँग्रेस तर पूर्वीपासून हेच करते मात्र या लोकांकडून अशी अपेक्षा नव्हती”.

आणखी वाचा- “महाराष्ट्रात ‘जय जिजाऊ जय शिवराय’चे झेंडे लावायचे नाही तर काय पाकिस्तानचे लावायचे?”

आणखी वाचा- …तर भाजपा रस्त्यावर उतरेल, फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला इशारा

मराठा आरक्षणावरून मराठा संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. यासाठी काही संघटनांनी शहरात जोरदार आंदोलन करण्याचे ठरवलं होतं. मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलन करून सरकारवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न या संघटनांकडून सुरु आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्य़ांमधून मोठय़ा प्रमाणात मराठा समाजाचे कार्यकर्ते शहरात येण्याची शक्यता होती. यामुळे सोमवारी सकाळपासून ठाणे, मुलुंड आणि मानखुर्द टोलनाका परिसरात पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांना थांबवून पोलीस या वाहनांची तपासणी करत होते. या नाकाबंदीमुळे वाहतूक कोंडी झाल्याने सामान्य प्रवाशांना याचा त्रास सोसावा लागला.