करोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ विधिमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आलं आलं आहे. आज विधिमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा म्हणजेच अखेरचा दिवस आहे. आज विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक पार पडणार आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्यात ही निवडणूक रंगणार असली तरी यापूर्वीच भाजपानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही निवडणूक सद्यस्थितीत होऊ नये यासाठी भाजपानं न्यायालयात धाव घेतली आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत माहिती दिली.

भाजपाकडून विधानपरिषदेचे सदस्य भाई गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे. सध्या करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. परंतु या अधिवेशनादरम्यान अनेक सदस्य अनुपस्थित आहेत. गोपीचंद पडळकर, परिणय फुके, प्रविण पोटे या परिषदेच्या सदस्यांना करोनाची लागण झाली आहे. अशा परिस्थितीत निवडणुकीची घाई का केली जात आहे? असा सवाल दरेकर यांनी केला. भाजपानं विधिमंडळात याबाबत नेत्यांची बैठक बोलावली होती. तसंच याबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्याचाही निर्णय घेण्यात आला.

“उपसभापतीपदासाठी एकमतानं निर्णय व्हावा अशी आमची भूमिका होती. परंतु पावसाळी अधिवेशनानंतर पुन्हा त्वरित अधिवेशन नाही. पुढील अधिवेशनातही निवडणूक घेता आली असती. परंतु सदस्यांच्या मतदानाचा हक्क डावलून अशा प्रकारचे निर्णय थोपण्याचं काम सरकारकडून सुरु आहे. आमची संख्याही मोठी असून आम्ही निवडणुका घेऊ शकतो. त्यामुळेच आम्ही अर्ज दाखल केला आहे,” अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सद्यस्थितीत विधान परिषदेत १८ जाणा रिक्त आहेत. तर भाजापाचे २३, शिवसेनेचे १५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ९ आणि काँग्रेसचे ८ सदस्य आहेत.