25 February 2021

News Flash

सातारा : बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी-काँग्रेसपुढे प्रथमच भाजपचे आव्हान!

राष्ट्रवादीच्या उदयानंतर जिल्ह्य़ात घडय़ाळाची टिकटिक सुरू झाली.

(संग्रहित छायाचित्र)

वेध विधानसभेचा :

दयानंद लिपारे, सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील सर्वात मोठे संस्थान असलेल्या सातारा जिल्ह्य़ात या वेळच्या विधानसभा निवडणुकीत प्रथमच भाजप-शिवसेनेकडून आव्हान मिळत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आपला ‘अजिंक्य’गड राखण्यासाठी धावाधाव करावी लागणार आहे, तर भाजप खाते उघडण्यासाठी आणि शिवसेना आपले क्षितिज रुंदावण्यासाठी धडपड करीत आहे. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशाने पक्षाची ताकद वाढली आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत कलह सुरू झाल्याने शरद पवार यांनी साताऱ्यावर करडी नजर ठेवली आहे.

सातारा जिल्ह्य़ात काँग्रेसचे वर्चस्व दीर्घकाळ होते. राष्ट्रवादीच्या उदयानंतर जिल्ह्य़ात घडय़ाळाची टिकटिक सुरू झाली. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकार येथे राष्ट्रवादीची ताकद सातत्याने दिसून आली. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात उभय काँग्रेसला दणका बसला, पण त्यांना हात दिला तो सातारा जिल्ह्य़ाने. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले पुन्हा निवडून आले असले तरी युतीची ताकद वाढल्याचे चित्र समोर आले.

राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद वाढले

लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच राष्ट्रवादीतील वादाला पुन्हा तोंड फुटले. नीरेच्या पाण्यावरून खासदार उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील वाद खालच्या पातळीवर घसरला. ‘स्वयंघोषित छत्रपती’ अशी टीका रामराजे यांनी उदयनराजे यांच्यावर केली. रामराजे यांनी उदयनराजे, खासदार रणजित निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्या बाबतीत माझी भूमिका पिसाळलेलीच असेल, अशी टीका केली. खासदाराला आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू, असा इशारा रामराजे यांनी दिला. शरद पवार यांनी बैठक बोलावूनही तोडगा निघाला नाही. उदयनराजे भोसले अर्ध्यातून उठून निघून गेले. फलटणमध्ये संवाद मेळाव्यात शेखर गोरे आणि निंबाळकर समर्थक एकमेकांना भिडल्याने राष्ट्रवादीमधला विसंवाद चव्हाटय़ावर आला. सातारा विधानसभा निवडणुकीत उदयनराजे यांच्याकडून दगाफटका बसण्याची भीती व्यक्त करीत आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सत्तेच्या बाजूने कल दाखवत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वादाने खीळ बसलेल्या राष्ट्रवादीला पुन्हा अस्तित्व टिकवण्यासाठी भाजप-शिवसेनेशी निकराची लढत द्यावी लागणार आहे.

महायुतीची आक्रमक व्यूहरचना

सातारा जिल्ह्य़ातील उभय काँग्रेसला धक्का देण्यासाठी भाजप-शिवसेनेने कंबर कसली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक रणनीती आखली आहे. पाटण व फलटण विधानसभा मतदारसंघ वगळता उर्वरित सहा मतदारसंघांत भाजप यश मिळवेल, असा दावा त्यांनी गेल्या आठवडय़ात केला आहे. जिल्ह्य़ातील जास्तीत जास्त मतदारसंघ भाजपकडे घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. साताऱ्यातील छत्रपतींचे वशंज पक्षात यावेत, असा भाजपचा अनेक दिवस प्रयत्न होता. त्याला शिवेंद्रराजेंच्या रूपाने यश आले आहे, तर भाजपमध्ये गेलेले पुरुषोत्तम जाधव यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेत घरवापसी केली आहे.

तुल्यबळ लढती

दोन्ही काँग्रेसला बालेकिल्ला टिकवून ठेवायचा आहे आणि महायुतीला बालेकिल्लय़ाला खिंडार पाडायचे आहे. यातून जिल्ह्य़ातील आठही मतदारसंघांत कडव्या लढती पाहायला मिळणार यात शंका नाही. सातारा शहरात शिवेंद्रसिंगराजे यांच्या विरोधात उदयनराजेंच्या आई कल्पनाराजे भोसले यांचे नाव पुढे येत आहे. कोरेगावात आमदार शशिकांत शिंदे यांना  भाजपचे महेश सावंत आव्हान देत आहेत. शिंदे यांच्या विरोधात त्यांचे विरोधक एकत्र येत आल्याने त्यांना खूपच मेहनत घ्यावी लागेल. वाई आणि पाटणमध्ये यंदाही पारंपरिक लढती रंगतील. वाईत आमदार मकरंद पाटील यांना मदन भोसले यांच्याशी, तर पाटणमध्ये सेनेचे आमदार शंभुराजे देसाई यांना विक्रमसिंग पाटणकर यांचे पुत्र सत्यजित यांच्याशी सामना करावा लागणार आहे. फलटण राखीवमध्ये दीपक चव्हाणविरोधात दिगंबर आगवणे यांनी मोहीम उघडली आहे. माणमध्ये काँग्रेसच्या जयकुमार गोरे यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र येत आहेत. त्यामुळे बंधू शेखर गोरे, निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख ही नावे पुढे येत आहेत. कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना अतुल भोसले यांचेच आव्हान असेल. लोकसभा निवडणुकीत दक्षिण कराडमध्ये पिछाडीवर राहिल्याने पृथ्वीराजबाबांसमोर आव्हान असेल. उत्तर कराडमध्ये आमदार बाळासाहेब पाटील यांना रणजित देशमुख यांच्याशी संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. सर्व लढती तगडय़ा असल्या तरी महायुती आणि महाआघाडीअंतर्गत कलह कसे थोपवतात, यावर बरेच काही अवलंबून असेल.

पक्षीय बलाबल

’ सातारा – राष्ट्रवादी

’ कोरेगाव – राष्ट्रवादी

’ वाई – राष्ट्रवादी

’ पाटण – शिवसेना

’ फलटण – राष्ट्रवादी

’ माण – काँग्रेस

’ कराड दक्षिण – काँग्रेस

’ उत्तर कराड – राष्ट्रवादी

सातारा जिल्ह्य़ातील आठही मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार निवडून आणण्याची आमची रणनीती आहे. आमच्याकडेही आता गावोगावी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. जिल्ह्य़ामध्ये मोठा मतदारवर्ग आमच्या पाठीशी आहे. भाजपच्या वाटय़ाला येतील त्या व शिवसेनेच्याही जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत.

– विक्रम पावस्कर, जिल्हाध्यक्ष, सातारा, भाजप

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटय़ाला येणाऱ्या सातारा जिल्ह्य़ातील सर्व जागा नेटाने निवडून आणू. आज जिल्ह्य़ातील पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. त्या कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करू. या सरकारविरोधात गावोगावी लोकजागृती करीत आहोत. माणबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील तर सातारच्या जागेसाठी इच्छुकांचे अर्ज पक्षाकडे आले आहेत. ही जागा आमच्याकडेच असेल.

 – शशिकांत शिंदे, आमदार , राष्ट्रवादी काँग्रेस

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 3, 2019 4:05 am

Web Title: bjp challenge first time for ncp congress in satara zws 70
Next Stories
1 सांगलीत उमेदवारीबाबत भाजपमध्ये वादळापूर्वीची शांतता!
2 दिलीप गांधी यांच्यासह भाजपच्याही प्रतिमेला तडा
3 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचा लढा
Just Now!
X