भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांना पत्र लिहिलं असून उपसभापती निवडणूक प्रकरणी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. दुजाभाव व प्रभावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला असून भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल असं त्यांनी म्हटलं आहे. सोबतच भाजपाविरोधात कितीही षडयंत्र रचलीत तरी तुम्ही त्यात यशस्वी होणार नाही असंही ते म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटील यांनी पत्र ट्विट केलं आहे.
चंद्रकांत पाटील यांनी पत्रात काय म्हटलं आहे?
चार वर्षांपूर्वी सभापती म्हणून निवडताना आयुष्यात राष्ट्रवादीला कधीही न केलेले मतदान आम्ही केले. परंतू आमचे सरकार असतानाही तुम्ही कधीही आम्हाला सहकार्य केले नव्हते. परंतू आज तर दुजाभावाचा, दबावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला आहे.
करोनामध्ये उपसभापतीची निवडणूक? भाजपाचे तीन सदस्य कोविड बाधित तरीही निवडणूक? सभागृहात ७८ च्या ऐवजी ६० सदस्य उपस्थित तरीही निवडणूक? कोर्टात केस पेंडिंग, तरीही निवडणूक? आश्चर्य आहे. एक निस्पृह व्यक्तीमत्व म्हणून आपल्याबद्दल आमच्या मनात असलेला आदर आज निश्चितच कमी झाला आहे. असो राजकारणात हे चालायचंच
दुजाभाव व प्रभावाखाली काम करण्याचा आपण कळस गाठला..पण भाजपा हा भेदभाव लक्षात ठेवेल.भाजपा विरूद्ध तुम्ही कितीही षडयंत्र रचलीत तरी तुम्ही त्यात यशस्वी होणार नाही. असो ..राजकारणात हे चालायचंच.. pic.twitter.com/b1mm1V7bGL
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) September 8, 2020
नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी निवड
विधानपरिषदेत नीलम गोऱ्हे यांची एकमतानं उपसभापतीपदी निवड करण्यात आली आहे. महाविकास आघाडीकडून उपसभापतीपदासाठी नीलम गोऱ्हे तर भाजपाकडून भाई गिरकर यांच्या नावाची निवड करण्यात आली होती. परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर एकमतानं नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. निवडणुकीच्या वेळी भाजपानं सभात्याग केला.
निवडणुकीपूर्वी भाजपानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, याबाबतचा निकाल गुरूवारी न्यायालय देणार असल्याची माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली. तसंच या ठिकाणी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी विनंतीही त्यांनी केली. यावर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं म्हटलं. तसंच यानंतर आवाजी मतदान घेण्यात आलं आणि नीलम गोऱ्हे यांची उपसभापतीपदी नियुक्ती करण्यात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2020 5:41 pm