महाविकास आघाडी सरकारने अखेरीस राज्यातील मंदिरे व प्रार्थनास्थळे सोमवारपासून उघडण्याची परवानगी दिली असली तरी हा भक्तांच्या श्रद्धेचा विजय आहे, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी सांगितले. मंदिरांमध्ये दर्शन घेताना भाविकांनी करोनाविषयी निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात टाळेबंदी निर्बंध शिथिल करण्याची प्रक्रिया सुरू करून अनेक बाबींना परवानगी दिली, तरी अनेक महिने मंदिरे आणि प्रार्थनास्थळे उघडण्याची परवानगी दिली नव्हती. यासाठी आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या पुढाकाराने मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने करावी लागली. भाजपाने भाविकांच्या आंदोलनांना सक्रिय पाठिंबा दिला. पण सत्तेसाठी महाविकास आघाडी सरकार आंधळे झाले असल्याने मद्यालये उघडण्यास परवानगी दिली तरी देवालये उघडण्यास परवानगी देत नव्हते.

देवस्थाने बंद असल्याने त्यांच्या परिसरात भाविकांची सेवा करणाऱ्या व्यावसायिकांची रोजीरोटी बंद झाली होती. करोनाचे सर्व निर्बंध पाळण्याची तयारी भाविकांनी दाखवली तरीही हे सरकार कठोरपणे परवानगी नाकारत होते, असा आरोपही त्यांनी केला.