एकीकडे राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पंढरपुरात अजित पवारांच्या सभेत तुफान गर्दी झाली होती. यावेळी करोनासंबंधित नियमाचं पालन करण्यात आलं नसल्याने विरोधकांकडून कारवाईची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्ह करत राज्यातील जनतेला निर्बंध पाळत सहकार्य करण्याचं आवाहन केल्यानंतर काही वेळातच ही सभा पार पडली. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार पंढरपुरात आहेत.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले –
“एका अर्थाने मोगलाई आली आहे….हम करे सो कायदा. आम्ही कसलेही कायदे पाळणार नाही असं…शरद पवारांनी फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं आवाहन केलं. आम्ही सहकार्य करत आहोतच ना…आमचा प्रचंड विरोध होता पण एका शब्दाने बोललो का. आता अजित पवारांवर कारवाई करा मग…आहे का उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत,” असं आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.

अजित पवारांच्या सभेतील गर्दी

प्रवीण दरेकर यांचं ट्विट –
“एकीकडे शरद पवार करोनाचे नियम पाळा म्हणून महाराष्ट्राला आवाहन करतात, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपुरात नियमांची धज्जी उडवली गेली आहे, नियम काय फक्त सर्वसामान्यांना आहेत का पवार साहेब?,” अशी विचारणा भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

“पवार साहेब, गुन्हा दाखल करायला सांगणार का उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध ? करणार नसाल तर आजपासून महाराष्ट्रातील कुणावरही नियम मोडल्याबद्दल सरकारला गुन्हा दाखल करता येणार नाही,” असंही ते म्हणाले आहेत.

नवाब मलिकांचं स्पष्टीकरण 
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं नसल्याचं म्हटलं आहे. सरकारने जी नियमावली तयार केली होती त्यातून पंढरपूर निवडणूक वगळण्यात आली होती अशी माहिती त्यांनी दिली. भाजपाला त्यांचा उमेदवारासाठी परवानगी हवी असेल तर त्यांनाही दिली जाईल. राष्ट्रवादीसाठी वेगळा नियम नाही असंही ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.