News Flash

“खोटं पडल्यानंतर शरद पवारांनी बोलणंच बंद केलं,” गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

"धनंजय मुंडेंच्या वेळीही सहा तास पवारांच्या घरी बैठक चालली"

संग्रहीत छायाचित्र

मुंबई उच्च न्यायालयाने न्यायालयाने सीबीआय चौकशी करण्याचा आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून तो मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यात आला आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची माहिती दिली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं पत्र समोर आल्यापासूनच भाजपाकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अखेर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला असून भाजपाकडून निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे.

अनिल देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निर्णयाचं स्वागत करताना राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवारांवर निशाणा साधला.

यावेळी ते म्हणाले की, “जे जे चुकेल त्याला शासन आहे, तोपर्यंत लोकशाही सदृढ होणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनात शंक होती. पवारांच्या घरी बैठक आहे, काय निर्णय घेतील? धनंजय मुंडेंच्या वेळीही सहा तास पवारांच्या घरी बैठक चालली. पण शेवटी धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत असा निर्णय झाला”.

“शरद पवारांचा आशीर्वाद असला तरी अनिल देशमुख कायदा आणि राज्यघटनेपेक्षा मोठे नाहीत”

“परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतरदेखील शरद पवारांकडे बैठक झाली. त्यावेळी राजीनामा न घेण्याचा निर्णय झाला. शरद पवारांनी बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. पण खोटं पडल्यानंतर त्यांनी बोलणंच बंद केलं. पण शरद पवार निर्णय घेत नाहीत तोवर राजीनामा झाला नसता. त्यामुळे मी समाधान करतो. शरद पवारांनी संवेदनशीलतेने सीबीआयचा तपास लागल्यावर मंत्रीपदावर राहता येत नाही याची जाणीव ठेवून निर्णय घेतला आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

अनिल देशमुखांचं ट्विट –
न्यायालयाने चौकशीचे आदेश दिले असल्याने गृहमंत्री पदावर राहणं मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही. म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे असं अनिल देशमुख यांनी ट्विट करत सांगितलं आहे.

नवाब मलिक यांनी काय सांगितलं –
“मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अनिल देशमुखही उपस्थित होते. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर शरद पवार यांनी होकार दिला. देशमुख यांनी पवारांकडे राजीनामा दिला असून, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला ते निघाले आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटून ते त्यांच्या पदाचा राजीनामा देणार आहेत,” अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 4:14 pm

Web Title: bjp chandrakant patil ncp sharad pawar home minister anil deshmukh resignation sgy 87
Next Stories
1 देशमुखांचा राजीनामा म्हणजे आमच्या लढ्याला मिळालेलं यश; महाराष्ट्र भाजपाचा दावा
2 गृहमंत्रीपद कोणाकडे सोपवणार?; नवाब मलिक यांनी केलं स्पष्ट
3 अनिल देशमुखांचे राजीनामा पत्र : “…म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतोय”
Just Now!
X