औरंगाबादचं नामांतर करण्यासंबंधी सध्या शिवेसना आणि काँग्रेसमध्ये मतांतर असल्याचं समोर आलं आहे. औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा कोणताही प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आला तर त्याला काँग्रेसचा विरोध असेल असं प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळसाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे नामांतरासाठी नेहमी आग्रह धरणारी शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे. यादरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावरुन टीका केली आहे. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

“औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर हा आमचा राजकीय मुद्दा नाही, तो आमचा श्रद्धेचा विषय आहे. तसंच निवडणुकीचा मुद्दा देखील नाही. अजूनही या देशात लोकांना औरंगजेबाबद्दल प्रेम आहे का? काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का? समजा असेल तर औरंगजेबाचं नाव तरी कशाला? ते पहिले हटवा. संभाजी महाराजांचं नाव हे संभाजीनगर शहराला असणं याबाबत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून भूमिका होती. पाच सहा महिन्यांपूर्वी जेव्हा मी संभाजीनगर नामांतर व्हावं असं म्हटलं होतं तेव्हा सामनाने माझ्यावर अग्रलेख लिहिला होता,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

“तुम्ही संपादिका आहात…,” चंद्रकात पाटील रश्मी ठाकरेंना लिहिणार पत्र

पुढे ते म्हणाले की, “सामनामधून माझ्यावर गलिच्छ भाषेत अग्रलेख लिहिला होता. या विषयावर मी रश्मी वहिनींना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात..अग्रलेख तुमच्या नावाने लागतो. आताही संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यावर जी भाषा वापरली तिथे रश्मी वहिनी असणारं संपादकीय असू शकत नाही”.

“आता बघू बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी?”

“ज्यावेळी हे गोधड्या भिजवत होते तेव्हा बाळासाहेबांनी मागणी केली होती असं ते म्हणाले होते. चांगलं आहे, मग बाळासाबेबांनी केलेली मागणी धरुन धरा. हा काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद असून आम्हाला यात पडायचं नाही,” असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

औरंगाबादच्या नामांतरला काँग्रेसचा विरोध, महाविकास आघाडीत ठिणगी?

“नवीन वर्षात अध्यक्ष म्हणून खूप प्रवास करुन संघटन मजबूत करण्याचा माझा संकल्प आहे. १४ हजार ग्रांमपंचायत निवडणुका १५ जानेवारीला आहेत. त्या अधिकाधिक जिंकाव्यात यासाठी प्रयत्न आहे. याशिवाय २०२२ साली मुंबईसह पालिका निवडणुका लढवणे, जिंकणे हादेखील संकल्प आहे. तसंच त्यातही मुंबईवर दिल्लीचंही लक्ष राहील. मुंबईच्या पायाभूत समस्यांकडे दुर्लक्ष करणं आणि पैसे गोळा करणं एवढंच लक्ष राहिलं आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली.