एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि त्यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं होतं. एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून कॅडबरी मिळते की लिमलेटची गोळी तेच बघायचं आहे असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले होते की, “चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी संबंध काय? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आलात”. दरम्यान त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून आपल्यासाठी विषय संपल्याचं सांगितलं आहे.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अटल बस सेवेचा शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चंद्रकांत पाटील यांना कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून तुम्ही भाजपात आलात. तसंच माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेन असं विधान एकनाथ खडसे यांनी केल्यासंबंधी विचारलं असता ‘रात गयी, बात गयी’ म्हणत त्यांनी उत्तर देणं टाळलं.

खडसेंवर टीका करताना काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
“एकनाथ खडसे दुपारी दोन वाजता राष्ट्रवादीत प्रवेश घेणार होते त्या प्रवेशाला चार वाजले. राष्ट्रवादीचं खडसेंना काय द्यायचं ते ठरलेलं नाही. तुमचं समाधान होईल असं देऊ या शब्दावर नाथाभाऊ बळेबळे नरीमन पॉईंटच्या घरातून बाहेर पडले. आता तुमचं समाधान होईल…यामध्ये लिमलेटच्या गोळीनेही समाधान होतं आणि कॅडबरीनेही. त्यामुळे राष्ट्रवादी आता खडसेंना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी ते बघावं लागेल,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.