राज्य सरकारने माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे सरकारकडून घेण्यात आलेला हा निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान चौकशी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय चुकीचा असून सहभाग घेणाऱ्या जनतेचीही चौकशी करणार का ? असा सवाल त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना विचारला आहे.

“जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याचा निर्णय चुकीचा आहे. यामध्ये जनतेचाही सहभाग होता, तर मग जनतेची ही चौकशी करणार का? जलयुक्त शिवार योजनेबाबत सरकार कोणाचीही चौकशी करू शकतं. मात्र त्यातून चांगली कामं झाली आहेत याचा विसर पडता कामा नये,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

जलयुक्त शिवार योजनेचे अनेक फायदे झाल्याचं चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं. “जमिनीतील पाणी साठा वाढला असून त्याचा फायदा झाल्याचं शेतकऱ्यांनी अनुभवलं आहे. पीक दुबार तिबार घेण्याचा आनंद शेतकऱ्यांनी अनुभवला आहे. पाणीटंचाईचे बरेच प्रश्न कमी झाले असून पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरची संख्या कमी झाली आहे,” असं त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी आरेमधील कारशेड कांजूरला हलवण्याच्या निर्णयावरही टीका केली. “आरे येथील कारशेड बदलण्याचा निर्णय चुकीचा आहे. कांजूरमार्ग येथे तो बदलण्याचा निर्णय सरकारच्या अंगलट येईल. त्यामुळे हा प्रकल्प पाच वर्षे रखडेल,” अशी भीती यावेळी त्यांनी व्यक्त केली. “राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.