राजधानी दिल्लीत महाराष्ट्राचा चित्ररथ प्रजासत्ताकदिनी दिसणार नसल्याने राज्यात त्यावरून राजकारण सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर, चित्ररथावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला टोला लगावला आहे. ‘कशाचंही खापर मोदींवर फोडलं जात असल्याचे ते म्हणाले. तसंच महाराष्ट्राचा यापूर्वीही अनेकदा चित्ररथ नव्हता’, असंही पाटील म्हणालेत.

चंद्रकांत पाटील हे पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना, “चित्ररथाचा तांत्रिक विषय आहे. महाराष्ट्राचा यापूर्वीही अनेकदा चित्ररथ नव्हता. कारण ते रोटेशन पद्धतीने ठरवलं जातं. या सरकारमध्ये कशाचंही खापर आणून मोदींवर फोडतात. हा तांत्रिक भाग आहे. दरवर्षी तीस ते चाळीस टक्के राज्याचे रथ येतात. अतिशय तांत्रिकरित्या महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल रोटेशनमधून बाहेर पडले.  बऱ्याच देशांचे प्रतिनिधी ते पाहायला येत असतात, सगळ्या राज्याचे रथ म्हणजे कंटाळवाणे होऊ शकते”, असं पाटील म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी चित्ररथावरून भाजपावर टीका केली होती. भाजपा हे द्वेषाचे राजकारण करत असल्याचं ते म्हणाले होते. प्रजासत्ताकदिनी तेथून रथ जाणे ही अभिमानाची बाब आहे. परंतु त्याला नकार देणे हा संभ्रमाचा विषय आहे, असं कोल्हे म्हणाले होते.