धुळे महापालिकेत भाजपाची एकहाती सत्ता आली असून महापौरपदी चंद्रकांत सोनार यांची निवड झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवार मंगला अर्जुन यांनी महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने चंद्रकांत सोनार यांची बिनविरोध निवड झाली. महापौर, उपमहापौर निवडणुकीत आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाचे महापौर, उपमहापौर निवडून आले आहेत.
भाजपा आणि बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या येथील महापालिका निवडणुकीत तीनवरून ५० जागांपर्यंत मुसंडी मारत भाजपाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. नाशिक, जळगाव या महापालिका ताब्यात घेणारे निवडणूक प्रभारी तथा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या निवडणुकीतही पर्यटनमंत्री जयकुमार रावल आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या जोडीने सर्व विरोधकांना चारीमुंडय़ा चीत केले. यानिमित्ताने महापालिका निवडणूक जिंकण्याचा ‘महाजन पॅटर्न’ पुन्हा यशस्वी झाला.
धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाने 50, काँग्रेसने सहा, राष्ट्रवादीने आठ आणि एमआयएमने चार जागा जिंकल्या. शिवसेना आणि समाजवादी पक्षाला प्रत्येकी दोन जागांवरच समाधान मानावं लागलं. लोकसंग्राम आणि बसपा प्रत्येकी एक जागा जिंकण्यात यशस्वी राहिले. दोन जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला.
धुळे भयमुक्त करण्याची आमची जबाबदारी-महाजन
महानगरपालिका निवडणुकीत धुळेकरांनी ‘मिशन फिफ्टी प्लस’ यशस्वी केले. घाणेरडय़ा प्रचाराला धुळेकरांनीच चपराक दिली आहे. आता भयमुक्त शहर करणे, पाण्याची समस्या सोडविणे ही जबाबदारी आमची आहे. धुळेकरांना निश्चितच आता बदल घडवून दाखवू, अशी ग्वाही जलसंपदा मंत्री आणि भाजपच्या विजयाचे प्रमुख शिलेदार गिरीश महाजन यांनी दिली आहे.
महापालिकेतील संख्याबळ
भाजप ५०
काँग्रेस ६
शिवसेना १
राष्ट्रवादी ८
लोकसंग्राम १
एमआयएम ४
समाजवादी पक्ष २
बसप १
अपक्ष १
एकूण जागा – ७४
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 31, 2018 1:12 pm