भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक विद्वान, कर्तबगार आणि राष्ट्रीय विचारांसाठी समर्पित नेता गमावला आहे, अशी श्रद्धांजली भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अर्पण केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, अरुण जेटली विद्वान कायदेतज्ज्ञ होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमध्ये अर्थ आणि संरक्षण खात्यांची जबाबदारी सांभाळताना अरुण जेटली यांची कर्तबगारी दिसली. देशात जीएसटी लागू करण्याची ऐतिहासिक कामगिरी त्यांच्या अर्थमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाली. श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळातही अरुण जेटली यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडली होती. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून २००९ ते २०१४ या कालावधीत त्यांनी काँग्रेस आघाडी सरकारचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला. अरुण जेटली यांचे भाजपाच्या धोरणनिश्चितमध्ये मोलाचे योगदान होते. पक्षाची भूमिका मांडणारे ठराव तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. आजारपण असतानाही ते सातत्याने महत्त्वाच्या विषयावर लेखन करून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते. त्यांनी ६ ऑगस्ट रोजी कलम ३७० रद्द करण्याविषयी अभ्यासपूर्ण लेख लिहून या ऐतिहासिक घडामोडीचे महत्त्व स्पष्ट केले होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, अरुण जेटली राष्ट्रीय विचारांना समर्पित निष्ठावंत कार्यकर्ते होते. ते दिल्ली विद्यापीठात शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांनी १९७४ साली दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अभाविपच्या वतीने लढवून जिंकली आणि इतिहास घडवला. लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी १९७३ साली चालू केलेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता. १९७५ साली आणीबाणीविरोधी आंदोलनामुळे त्यांना अटक झाली व त्यांनी १९ महिने कारावास भोगला. जनता पार्टीच्या प्रचारासाठी स्थापन झालेल्या लोकतांत्रिक युवा मोर्चाचे ते राष्ट्रीय संयोजक होते. त्यांच्या निधनाने भाजपाने महत्त्वाचे विचारधन गमावले आहे.