पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. या आत्महत्येमागे महाविकास आघाडीमधील एक मंत्री असल्याचं वारंवार सांगितलं जात होतं. मात्र हा मंत्री कोण आहे याचा उलगडा होत नव्हता. यादरम्यान भाजपाने पहिल्यांदाच जाहीरपणे शिवसेना नेते संजय राठोड यांचं नाव घेतलं असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट केलं असून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो असं त्यांनी म्हटलं आहे.

“पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी व्हायरल ऑडिओ क्लिप्सची सखोल चौकशी करा!”
“साहेब तिला जरा समजावून सांगा”, पुण्यातील तरुणी आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल

“पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या नसून हत्या असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसांत समोर आले आहेत. त्यामध्ये जवळपास १० ते ११ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. काही फोटो समोर आले आहेत. या सगळ्या गोष्टींमधून तिला आत्महत्येसाठी परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर दरवाजा तोड पण तिचा मोबाइल ताब्यात घे असं सांगताना मंत्री दिसत आहेत. पोलीस याबद्दल अजूनही स्पष्टता देत नाहीत,” असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.

“तरुणीच्या कुटुंबावर दबाव असू शकतो. पोलिसांनी सुओ मोटो अंतर्गत गुन्हा दाखल करायला पाहिजे. सगळे ऑडिओ क्लिप्स, फोटोंबद्दल गेल्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या बातम्या यांचा थेट रोख शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाच पाहिजे,” अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

“गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीही महत्वाची आहे. भाषणांमध्ये महिलांच्या सुरक्षेबद्दल बोलणं फार सोपं असतं पण आता राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सांगायचं आहे की, एवढे पुरावे असताना कसली वाट पाहत आहात. मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पाहताय?,” अशी विचारणा चित्रा वाघ यांनी केली आहे. संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला जावा आणि पूजाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.