सांगली : सांगलीत अद्याप म्हणावा तसा पाऊस पडत नसला तरी संथ वाहणाऱ्या कृष्णा नदीत सध्या कोयनेच्या पाण्यामुळे आयर्विन पुलाजवळ भोवरे पाहण्यास मिळत आहेत. हे भोवरे अधिक तीव्र स्वरूपाचे नसले तरी एखादा मोठा भोवरा पट्टीच्या पोहणाऱ्यालाही चकवा देऊ शकतो. याच पद्धतीने सध्या भाजपची महापालिका निवडणुकीची रणनीती आखली जात असून अन्य पक्षात स्थान नसलेल्यांना खुराक देऊन मदानात उतरवून बाजी मारण्याचा पक्षनेतृत्वाचा प्रयत्न आहे.

सांगली महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होऊन चार दिवसाचा अवधी उलटला असला तरी कोणत्याच पक्षाने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. उमेदवारांची यादी पहिल्याच दिवशी जाहीर करण्यात येईल, असे खुद्द महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले असतानाही यादी जाहीर करण्यास लागत असलेला विलंब काही तरी शिजत आहे हे सांगण्यास पुरेसा आहे.

जिंकण्याची क्षमता हाच महत्त्वाचा निकष उमेदवार निश्चितीसाठी भाजपचा आहे. यासाठी पक्षनिष्ठा, पक्षाची विचारसरणी याच्याशी काहीही देणेघेणे असण्याचा संबंध नाही. दोन दिवसांपूर्वी भाजपकडे उमेदवारीची मागणी करणाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात इच्छुकांनाच आमंत्रित करण्यात आले असताना सभागृह पूर्ण क्षमतेने भरले होते. मात्र, यात पक्षाचे विचार ऐकण्यापेक्षा मला उमेदवारी मिळते का नाही याची चाचपणी करण्यात येत होती. याचबरोबर पक्षाचे निष्ठावंत आणि उपरे असा संघर्ष आताच सुरू झाला असून जनसंघापासून पक्षाचे काम करणाऱ्यांनाही पदे देण्यात डावलले जात असल्याची भावना तीव्र होत असल्याचे या मेळाव्याच्या निमित्ताने दिसून आले.

गेल्या पाच-सहा वर्षांत पक्षाला जनाधार मिळूवन देण्यासाठी प्रसंगी स्वतचे आसन इतरांसाठी मोकळे करणारे आज पक्षातच दुर्लक्षित होत आहेत. पक्ष नेतृत्वाला पक्षाचा गुणात्मक विस्तार होण्यापेक्षा सत्तात्मक विकास साधायचा आहे. अगदी दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचे कमळ हा एककलमी कार्यक्रम हाती घेण्यात आल्याने पक्ष वाढविण्यासाठी ज्या ज्या मंडळींनी खस्ता खाल्ल्या, प्रसंगी खटले अंगावर घेतले ती मंडळी बेदखल झाली आहेत.

भाजपमध्ये सध्या पक्षांतर्गत असंतोष तीव्र आहे. याला संघटित स्वरूप जर आले तर काय करावे, याची चिंता आज पक्षाची बांधणी करणाऱ्यांना भेडसावत आहे. पक्षाला पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगले स्थान मिळवून देऊनही जर पदाचा लाभ मिळत नसेल आणि ज्यावेळी काही द्यायचे झाले तर बेरजेच्या राजकारणासाठी आयारामांना संधी दिली जात असेल तर एवढय़ा खस्ता खाऊन पक्ष वाढविण्याची गरजच काय? असा रास्त प्रश्न विचारला जात आहे.

नुकत्याच झालेल्या पक्ष मेळाव्यात बोलताना संपर्कमंत्री सुभाष देशमुख यांनी ज्यांना उमेदवारी मिळेल ते पक्षातीलच उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांची समजूत कशी काढतात यावर निवडणुकीतील हार-जीत अवलंबून असल्याचे सांगितले. म्हणजे, निष्ठावंत गटाकडून होत असलेले दबावाचे राजकारणही उमेदवारी जाहीर करण्यास विलंब लावण्यामागे आहे. तसेच सक्षम उमेदवाराची प्रतीक्षा आहे. अन्य पक्षातून विशेषत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून जर मातब्बर कार्यकत्रे मिळाले तर पक्षाची दारे त्याच्यासाठी अखेपर्यंत उघडी राहणार आहेत.

दिल्लीत सत्ता आमची, राज्यात सत्ता आमची, जिल्हा परिषदेत आम्हीच, मग महापालिका का नको एवढाच विषय आहे. शहराच्या विकासासाठी कोणते व्हिजन आहे? उद्योग विकासाचे काय? विस्तारित भागातील लोक रस्त्यासाठी कितीही आंदोलने करत असले तरी त्याला दाद मिळत नाही. शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा अजेंडा ना काँग्रेस-राष्ट्रवादीचा ना भाजपचा. शहराचे वाटोळे काँग्रेस-राष्ट्रवादीने केले, आमच्या हाती सत्ता द्या, दिल्ली, मुंबईत आमची सत्ता आहे मग आम्ही शहराच्या विकासासाठी वाट्टेल तेवढा निधी आणतो, असे सांगून मतांचे दान मिळविण्याचे प्रयत्न भाजप करणार आहे. मात्र, याच शहरातील मतदारांनी खासदार, आमदारांकडून शहर विकासाचेच स्वप्न बघितले होते. मग इतके दिवस शहराच्या अडचणी का नजरेआड करण्यात आल्या? महापालिकेत काँग्रेसची सत्ता होती, म्हणून नगर विकास खात्याचा सांगलीसाठी आलेला ३३ कोटी आणि मिरजेसाठी आलेला २० कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वळविण्यात आला.

महापालिकेत ५०० कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आमदार सुधीर गाडगीळ यांनी केला होता. या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असल्याचे सांगितले. मात्र, याचा पाठपुरावा का केला नाही? साधा सांगली-मिरज शहरातील ड्रेनेज योजनेचा झालेला खेळखंडोबा दिसत नाही का? याच्यावर कारवाईची मागणी रेटण्याची इच्छा का दिसली नाही? आज गल्लीबोळातील रस्ते तातडीने केले जात आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यावर पेव्हर ब्लॉक गेल्या वर्षी घातलेले असताना ते सुस्थितीतील रस्ते पुन्हा तयार करण्यात येत आहेत, हा शासकीय निधीचा अपव्यय नाही का? याची उत्तरे सत्ताधाऱ्यांनी देण्याची गरज आहे. अन्य पक्षातून आयात केलेल्यांना भाजपमध्ये गेल्यावर गोमूत्र शिंपडून पवित्र केले जाते, अशी मार्मिक टिप्पणी माजी मंत्री दिवंगत डॉ. पतंगराव कदम यांनी केली होती. हाच आरोप आता एखाद्या सामान्य माणसाने केला तर भाजपला त्याचे काहीही वाटणार नाही. कारण चेहरे तेच असले तरी पक्षाचा झेंडा हातात दिला की त्याचे शंभर गुन्हे माफ करण्याची रणनीती हाच सत्ता मिळविण्याचा सोपा मार्ग आहे.