विधान परिषद निवडणुकीसाठी २१ मे रोजी मतदान होत आहे. काँग्रेसनं दोन जागांचा हट्ट सोडल्यानंतर ही निवडणूक बिनविरोध होणार हे रविवारी सायंकाळी निश्चित झालं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीचा मार्गही मोकळा झाला आहे. असं असलं तरी अधिकृतपणे घोषणा होण बाकी असून भाजपानं त्या आधीच उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधीमंडळ सदस्यात्वाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळानं त्यांनी राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्यपालांकडून त्यास नकार आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाकडं निवडणूक घेण्याची मागणी केली होती. निवडणूक आयोगानं मागणी मंजूर करत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला होता.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर ९ जागांसाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले. मात्र, महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसनं दोन उमेदवार जाहीर केल्यानं निवडणूक चर्चेत आली होती. जागावाटपाबद्दल रविवारी तोडगा निघाला. त्यानंतर सायंकाळी निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं. त्यानंतर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं. “आमदारकीचं टेन्शन संपल. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन,” असं भातखळकर यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- … आणि निवडणुकीच्या घोडेबाजारासाठी आमदारांनी मुंबईत यायचं, हे योग्य नव्हते- शिवसेना

सध्या करोनाच्या चिंतेबरोबर राज्यात राजकीय चर्चांनी वेग घेतला आहे. निमित्त आहे विधान परिषदेच्या निवडणुकीचं. विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत असून, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीनं सर्वात शेवटी रविवारी आपल्या उमेदवारांची घोषणा केली.