अमरावती : देशात धार्मिक आधारावर दुही निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. आता निवडणुकीच्या पूर्वी वातावरण तापवून देशात जातीय दंगली घडवून आणल्या जाण्याची शक्यता आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी येथील जाहीर सभेत बोलताना केला.

परिवर्तन निर्धार यात्रेच्या निमित्ताने येथील नेहरू मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आपल्या खास शैलीत विनोद आणि उपहासाच्या माध्यमातून त्यांनी सरकारच्या कारभारावर टीका केली.

भुजबळ म्हणाले, या सरकारजवळ विकासाची कामे सांगण्यासाठी काहीच नाही, त्यामुळे आता धार्मिक विषयांचा आधार घेतला जात आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये दुही पसरवण्याचे काम केले जात आहे. देशात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. गोहत्याबंदीच्या विषयावरून मने कलुषित केली जात आहेत. भारतीय राज्यघटनेलाच धक्का लावण्याचे काम केले जात आहे. सरकारमधील काही लोक हिंदू देवतांच्या जाती शोधायला निघाले आहेत. त्यांना त्या शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा, याकरिता या सत्ताधाऱ्यांना घरी पाठवायला हवे. त्यांना मंदिर बनवायचे नाही, केवळ लोकांना वेडे बनवायचे आहे. महागाईचे उदाहरण देताना त्यांनी पेट्रोलच्या दराची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाशी केली. काही दिवसांमध्ये हे दर लालकृष्ण अडवाणी यांच्या वयाच्या पलीकडे जातील. भाजपला नावे बदलण्याची आवड आहे, कदाचित पेट्रोलचे नाव पंडित दीनदयाल उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ ठेवले जाईल, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

छगन भुजबळ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपण चहा विकत होतो, असे सांगतात. काय विकायचे ते विका पण, देश विकू नका, हे आपले त्यांना सांगणे आहे. एचएएलला सोडून अनिल अंबानीसारख्या उद्योजकाला राफेलचे कंत्राट का दिले, याचे उत्तर भाजपच्या नेत्यांकडे नाही. काँग्रेसच्या ६५ वर्षांच्या सत्ताकाळात देशावर ५१ लाख कोटींचे कर्ज झाले होते. पण, या सरकारच्या चार वर्षांच्या काळात आणखी ३१ लाख कोटी रुपये कर्ज झाले. जे आजवर झाले नाही, ते यांनी चार वर्षांत केले. या सरकारने देश विकायला काढला आहे.

आपल्याला सरकारने खोटय़ा आरोपांमध्ये तुरुंगात पाठवल्याचे सांगताना भुजबळ म्हणाले, ‘अजूनही आपल्याला का पकडण्यात आले, याची माहिती मिळाली नाही. ज्यांनी आपल्याला पकडून नेले, त्यांनाही का पकडले, हे माहीत नाही. आपण न्याय मागितला, पण आपल्याला तुरुंग मिळाला. तुम्ही तुरुंगात डांबून ठेवाल. आमचे घर जप्त कराल, पण, लोकांचे प्रेम जप्त करू शकत नाही. आपला आवाज बंद करू शकणार नाही.’

महागाईचे उदाहरण देताना त्यांनी पेट्रोलच्या दराची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वयाशी केली. काही दिवसांमध्ये हे दर लालकृष्ण अडवाणी यांच्या वयाच्या पलीकडे जातील. भाजपला नावे बदलण्याची आवड आहे, कदाचित पेट्रोलचे नाव पंडित दीनदयाल उपाध्याय बहुमूल्य तरल पदार्थ ठेवले जाईल.