महाराष्ट्र राज्यातील उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 (भाग दोन)चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार. उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते. विविध १२ देशांतील गुंतवणुकदारांसोबत १६ हजार ३० कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले. मात्र या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या एका फोटोवरुन महाराष्ट्र भाजपाने राज्य सरकारवर टीका केली आहे. सीएमओच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मागील बाजूला असलेल्या बॅनरवर महाराष्ट्राचा नकाशा उलटा (मीरर इमेज) दिसत असल्यावर भाजपाने, “याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह” असा टोला लगावला आहे.

अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत राज्य सरकारने करार केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री यांच्या उपस्थित व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे काही फोटो सीएमओच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आले आहेत. त्यापैकी एक फोटोमध्ये उद्धव ठाकरे यांच्या मागे करार झालेल्या देशांचे झेंडे आणि मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0चा बॅनर दिसत आहे.

मात्र या फोटोमध्ये लावण्यात आलेला महाराष्ट्राचा नकाशा असणारा बॅनर उलटा ठेवण्यात आला आहे. यावरुनच भाजापने ट्विटवरुन नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांसहीत राज्य सरकारला टोला लगावला आहे. “महाराष्ट्राचा नकाशा उलटा “करून दाखवला.” याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह! सगळं काही चौपट करून ठेवलं आहे आता नकाशा सुद्धा उलटा केला..” असं ट्विट महाराष्ट्र भाजपाने केलं आहे.

 

या ट्विटवरुन आता नवा वाद रंगताना दिसत आहे. शिवसेनेच्या काही समर्थकांनी या ट्विटला रिप्लाय करुन व्हीडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये समोर बसलेल्या व्यक्तीला महाराष्ट्राचा नकाशा सरळ दिसावा म्हणून तो तशापद्धतीने वापरण्यात आल्याचा दावा केला आहे. काही सरकार समर्थकांनी व्हिडिओ कॉलदरम्यान अनेकदा मीरर इमेजमध्ये मजकूर दिसतो त्यामुळेच नकाशा उलटा दिसून नये म्हणून अशापद्धतीची रचना केल्याचा दवा केला आहे.

या फोटोवरुन आता भाजपा समर्थक आणि सरकार समर्थकांमध्ये वाद सुरु झाला आहे. मात्र यासंदर्भात अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.