टुरिस्ट व्हिसा घेऊन रत्नागिरीत आलेले काही बांगलादेशी लोक आक्षेपार्ह गोष्टी करत आहेत. त्यांना प्रतिबंध करण्याची मागणी भाजपने निवेदनाद्वारे केली आहे. सीएए व एनआरसी कायद्याविरोधात सुरू असलेल्या बेकायदा कारवायांमध्ये त्यांच्या सहभागाची चौकशी होणे आहे. पोलिसांनी सखोल चौकशी करुन प्रतिबंधात्मक कारवाई करावी असं निवेदन भाजपाने दिलं आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, “राजीवडा परिसरात बांगलादेशी नागरिक टुरिस्ट व्हिसा घेऊन वास्तव्यास आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हे टुरिस्ट जमाते तबलीकच्या प्रसारासाठी काम करणारे आहेत. टुरिस्ट व्हिसा असल्याने त्यांनी केवळ टुरिस्ट म्हणून राहणे अपेक्षित आहे. तसेच या व्यक्तींनी एकाच शहरात बराच काळ राहणे आक्षेपार्ह आहे. ते ज्यांच्या संपर्कात आहेत त्याबाबतही जागरुकता ठेवणे गरजेचे आहे.”

टुरिस्ट व्हिसाचा उपयोग करून रत्नागिरीच्या वास्तव्यात ते धार्मिक प्रसार तसेच राष्ट्रीय सरकारविरोधात गैरसमज पसरवत फिरत आहेत, ही बाब अत्यंत गंभीर असून राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने व स्थानिक सलोखा व शांतता यांना बाधा आणणारी आहे. शहरा त्यांचे असलेले वास्तव्य व चाललेल्या आक्षेपार्ह हालचाली हा विषय संवेदनशील असून गंभीर आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार आपणापर्यंत माहिती देत आहोत. पोलीस खात्याचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन देत आहोत. अशा बांगलादेशी नागरिकांविरुद्ध त्वरीत प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली.

या वेळी अ‍ॅड. बाबा परुळेकर, अ‍ॅड. कदम, अ‍ॅड. रेडीज, सचिन वहाळकर, प्रशांत डिंगणकर, भाजप शहराध्यक्ष सचिन करमरकर, नगरसेवक राजू तोडणकर, भाजयुमो शहराध्यक्ष विकी जैन, भैय्या मलुष्टे, संदीप रसाळ, राजन फाळके, बिपीन शिवलकर, महिला मोर्चा शहराध्यक्ष राजश्री शिवलकर, नगरसेविका प्रणाली रायकर, सुप्रिया रसाळ, रुमडे आदी उपस्थित होते.