सोलापूर : आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात दोन्ही काँग्रेसला पार दुर्दशा होऊन भाजपने पोलादी पकड बसविली आहे. तर मागोमाग शिवसेनेही स्वत:ची ताकद वाढविण्याचा विडा उचलला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजण्यास आणखी काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना दोन्ही काँग्रेसमधील सुभेदारांसह छोटय़ा-मोठय़ा नेत्यांची भाजप-सेना युतीत भरती सुरूच आहे. येत्या १ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा समारोप सोलापुरात होत आहे. त्यानिमित्ताने भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  येत आहेत. त्याचे औचित्य साधून भाजपचे मोठे शक्तिप्रदर्शन होणे अपेक्षित असतानाच दोन्ही काँग्रेसची आणखी काही नेतेमंडळी भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने राजकीय हालचाली वाढल्या आहेत.

आगामी विधानसभा निवडणुका पुन्हा जिंकण्यासाठी सज्ज झालेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या पाच वर्षांतील कामांचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यासाठी गेल्या १ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्य़ातील मोझरी येथून-राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कर्मभूमीतून पहिल्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेला प्रारंभ केला होता. या माध्यमातून विदर्भ व उत्तर महाराष्ट्राच्या दहा जिल्ह्य़ांतील ३९ विधानसभा मतदारसंघांतून एकूण १०३९ किलोमीटर प्रवास करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात १४ जिल्ह्य़ांतील ५० विधानसभा मतदारसंघांमध्ये १४८४ किलोमीटर प्रवास करून येत्या १ सप्टेंबर रोजी यात्रेचा समारोप सोलापुरात होत आहे. महाजनादेश यात्रेच्या दोन्ही टप्प्यांत मिळून एकूण २४ जिल्ह्य़ांतील ८९ विधानसभा मतदारसंघांतून २५८४ किलोमीटर इतका प्रवास करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वत:चे नेतृत्व भक्कम करण्याबरोबरच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पुनश्च फत्ते होण्यासाठी धूमधडाका चालविला आहे.

या महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी विचारपूर्वक सोलापूर निश्चित करण्यात आल्याचे दिसून येते. कारण पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा अभेद्य गडाला खिंडार पाडण्याची सुरूवात याच सोलापूर जिल्ह्य़ातून झाली होती. ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कुटुंबीयांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीशी असलेले संबंध तोडून थेट भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पाठोपाठ जिल्ह्य़ात इतर अनेक लहान-मोठय़ा नेत्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा सपाटा लावला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर वर्षांनुवर्षे निष्ठेने, प्रेमाने साथ देणाऱ्या सोलापुरात आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा एक तरी आमदार निवडून येतो काय, याबाबत शंका व्यक्त होत असातना दुसरीकडे काँग्रेसचेही अस्तित्व पार धोक्यात आले आहे. दोन्ही आणखी काही आजी-माजी आमदारांसह साखर सम्राट भाजप प्रवेशासाठी उत्सुक आहेत. या सर्वाचा भाजप प्रवेश सोहळा १ सप्टेंबर रोजी सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या वेळी पक्षाचे अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होण्याचा घाट  घातला जात आहे.

अक्कलकोटचे काँग्रेसचे आमदार सिद्धराम म्हेत्रे हे अखेर भाजपमध्ये दाखल होण्याची अटकळ बांधली जात आहे. एवढेच नव्हे तर भाजपच्या एका प्रदेश नेत्याच्या दाव्यानुसार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, सातारचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, शरद पवार यांचे निकटचे नातेवाईक असलेले उस्मानाबादचे ज्येष्ठ नेते डॉ. पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आमदार राणा जगजितसिंह पाटील तसेच गेल्या लोकसभा निवडणुकीतील माढा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आदींची नावे भाजप प्रवेशासाठी पुढे आली आहेत.

प्रचाराचा नारळ? : भाजपमधील  महाभरती सोलापुरात अमित शहा यांच्या साक्षीने होणार असल्याचे भाजपचे प्रदेश नेते  आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले. त्यानुसार नारायण राणे व रामराजे निंबाळकर यांचा भाजप प्रवेश सोलापुरात १ सप्टेंबर रोजी होणार की  नंतर अन्य ठिकाणी होणार, याचीही उत्सुकता आहे. सोलापुरातील अमित शहा व देवेंद्र फडणवीस यांच्या या सभेच्या माध्यमातून विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे मानले जाते.