लोकसभा निवडणुकीत जनतेने नाकारलेल्या आघाडी शासनाने राजीनामा देऊन जनतेच्या दारात जावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करीत सोमवारी सांगलीच्या स्टेशन चौकात निदर्शने केली. सामान्य जनतेचा अंत न पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने थोडीशी जरी चाड असेल तर राजीनामा द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.
भाजपच्या राज्य महिला आघाडीच्या कार्यकारिणी सदस्य नीता केळकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, नगरसेविका स्वरदा केळकर, माजी नगरसेविका भारती दिगडे आदींसह कार्यकर्त्यांनी रॅली काढून आघाडी शासनाविरोधात निदर्शने केली. रॅलीमध्ये राष्ट्रवादीसाठी नॅनो कार व काँग्रेससाठी दुचाकी घेऊन एवढे संख्याबळ जनतेने दिले असताना शासन चालवण्याचा अधिकार गमावला असल्याचे सांगत जोरदार घोषणाबाजीही केली.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी केलेल्या निदर्शनाच्या आंदोलनापासून विद्यमान आमदार संभाजी पवार यांचा गट अलिप्त राहिला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपनेही चळवळ सुरू केली असून आजची निदर्शने या चळवळीचा भाग मानला जात आहे.