हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपाकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलताना त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरुन भाजपा नेत्यांकडून टीका केली जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील उद्धव ठाकरेंच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“हिंदुत्व कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही. हिंदुत्व जगावं लागतं. नुसतं भाषणातून बोलत चालत नाही. ज्यावेळी हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे जनाब बाळासाहेब होतात आणि ज्यावेळी शिवगान स्पर्धा बंद होते आणि अजान स्पर्धा सुरु होते तेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य द्यावं लागतं. म्हणून कदाचित त्यांनी हे वक्तव्य केलं. हिंदुत्व आमची मक्तेदारी नाही, पण तुम्ही का हिंदुत्व सोडलं एवढंच सांगावं,” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

जनता पर्यायाच्या शोधात!

शिवसेनेने इंधन दरवाढीविरोधीत मोर्चा काढण्याऐवजी राज्यातील कर कमी करावे असा सल्ला यावेळी त्यांनी दिला. शिवसेनेने मोर्चे न काढता, नौटंकी न करता जे आम्ही केलं होतं ते करुन दाखवावं असं आवाहनही यावेळी त्यांनी केली. वीज बिलाच्या मुद्द्यावर बोलताना फडणवीसांनी महाराष्ट्रात मोगलाई आली असल्याची टीका केली. संपूर्ण महाराष्ट्रात आपण निदर्शन करणार असल्याची माहिती फडणवीसांनी यावेळी दिली.

सेलिब्रिटी ट्विटर वॉरवर भाष्य
“कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरु आहे हे काल उघड झालं. जे आंदोलन सुरु आहे त्याचा फायदा घेऊन कशाप्रकारे भारताला बदनाम करायचं, भारतात अराजक निर्माण करायचं यासंदर्भातील योजना बाहेर आलेली आहे. कशाप्रकारे वेगवेगळ्या देशातील नेत्यांना यामध्ये आणून हा प्रश्न आंतरराष्ट्रीय करुन भारताला कसं बदनाम करायचं हे कालच्या ट्विटमुळे उघड पडले आहेत. आता देशातील लोकांनाही आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून काही लोक कशा पद्दतीने आपली पोळी भाजण्याचा आणि भारतविरोधी कामं करण्याचा प्रयत्न करत आहेत हे स्पष्ट झालं आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं आहे –
‘‘मी अयोध्येला गेलो तेव्हाच स्पष्ट केले होते, की भाजपपासून दूर गेलो आहे, हिंदुत्वापासून नाही. हिंदुत्वाचे ‘पेटंट’ भाजपने घेतलेले नाही; पण शिवसेना महाराष्ट्रापुरती राहिल्याने दरम्यानच्या काळात हिंदुत्वाचा पर्याय उभा करण्याबाबत देशात एक पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याची गरज आहे. एखादा पक्ष ती एकटा भरून काढेल किंवा काही जण एकत्र येऊन भरून काढतील; पण आता पर्याय हवा असे लोकांना वाटू लागले असून, लोकांना वाटते तेव्हा पर्याय उभा राहतो,’’ असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात देशात नवी समीकरणे उदयाला येऊ शकतात, असं सूचित केलं.

“बाबरी मशीद पडल्यावर इतरांनी हात झटकले; पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ती मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असे विधान केले. त्या एका वाक्याने शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल देशात लोकांना-नेत्यांना आकर्षण वाटू लागले; पण आम्ही त्या वेळी देशात मित्रपक्ष भाजप हिंदुत्वाचा झेंडा घेत असल्याने हिंदुत्ववादी पक्ष म्हणून महाराष्ट्रातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इतर ठिकाणी अनेक चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले. आता इतर राज्यांत शिवसेनेचे हिंदुत्व आवडत असेल तर जरूर काम करा, अशी भूमिका आम्ही घेतली आहे,” असं सांगत देशात इतर राज्यांत शिवसेनेच्या विस्ताराचा मनोदय मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.