ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्यकरणी भाजपा अनुसूचित जनजमाती मोर्चाला संबोधित करताना बोलत होते. यावेळी गिरीश महाजन यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

“राज्यात तीन पक्षांचं सरकार आहे. तिन्ही पक्ष तीन दिशेने चालले आहेत. सरकारची अवस्था अत्यंत वाईट आहे. एकाच कोचवर तिघे बसण्याचा प्रयत्न करत आहेत. दुसऱ्या कोचवर आपण एकटे असून आपल्याला भरपूर जागा तयार होत आहे. त्यामुळे राजकीय स्पेस मिळत आहे. त्याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीत आला असून ग्रामपंचायच निवडणुकीमध्ये सहा हजार ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष असल्याचं,” देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “तीन पक्षाचं सरकार राज्यात आलं आहे. तिन्ही पक्ष तीन दिशेने चालले आहेत. सरकार आणि राज्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. पण आपल्याला काळजी करण्याचं करण नाही. हे तीन पक्षाचं सरकार आलं तेव्हा काहींना भाजपाचं काय होईल असं वाटत होतं. मी सांगितलं होतं एखादी दुसरी निवडणूक इकडे तिकडे झाली तरी काळजी करू नका. हे तीन पक्ष आहेत. यांना बसायला जागा नाही. दोन कोच ठेवले आहेत एका कोचवर तीन लोक बसली आहेत आणि एका कोचवर आपण एकटे आहोत. त्यामुळे आपल्याला बसायला भरपूर जागा आहे. दोन लोक बसायची जागा नाही त्या ठिकाणी तिघे जण बसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपल्याकरिता भरपूर जागा तयार होत आहे. मोठ्या प्रमाणावर राजकीय स्पेस मिळत आहे. त्याचा प्रत्यय ग्रामपंचायत निवडणुकीत पाहिला”.

“ग्रामपंचायत निवडणुकीत साडेपाच हजार- सहा हजार ग्रामपंचायती भाजपाने जिंकल्या आहेत. तिघांनी मिळून देखील एवढ्या ग्रामपंचायतीत निवडून येऊ शकले नाहीत. आता खोटा आरोप करत आहेत. ग्रामपंचायतीमध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे,” अस फडणवीसांनी यावेळी सांगितलं.