News Flash

मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

"सरकारने जाहीर केलेलं पॅकेज ही निव्वळ धूळफेक"

मुंबई-पुणे याव्यतिरिक्तही महाराष्ट्र आहे असा टोला विधानसभा विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. सरकारने जाहीर केलेलं पॅकेज ही निव्वळ धूळफेक असल्याचंही ते म्हणाले आहेत. सरकारकडून जाहीर करण्यात आलेल निर्बंध आणि आर्थिक मदतीवरुन देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“कडक निर्बंध लावणार असाल तर विविध घटकांना मदत केली पाहिजे. पण सरकारने जाहीर केलेलं पॅकेज ही निव्वळ धूळफेक आहे. याचं कारण ३३०० कोटींची तरतूद करोनासंदर्भात सांगण्यात आली आहे ती नियमित बजेटमधील तरतूद आहे जी वर्षभरात खर्च होणार आहे. त्यामुळे सध्या वाढणाऱ्या करोनासाठी ही तरतूद नाही,” असं फडणवीसांनी म्हटलं आहे.

“सरकार किती बेड्स, व्हेंटिलेटर वाढवणार यासंबंधी माहिती देण्याची अपेक्षा होती. अनेक घटकांना सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. शेतकरी, मजूर, बारा बलुतेदार, केशकर्तनालय, छोटे उद्योग…कोणालाही कोणती मदत केलेली नाही. दिशाभूल करण्यात आली आहे. वृद्धापकाळ, श्रावणबाळ या केंद्र सरकारच्या योजना आहेत. यामध्ये सरकार अतिरिक्त १००० रुपये देईल असं वाटलं होतं. एकही नवीन पैसा मिळत नसून आगाऊ पैसा देत आहेत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. आदिवासींना २००० रुपये खावटी अनुदान म्हणजे तोंडाला पानं पुसण्यासारखं आहे असंही ते म्हणाले आहेत.

“अन्न सुरक्षा योजनेत अतिरिक्त देण्यात येईल असं सांगण्यात आलं असून यामध्ये काही कठीण नाही. त्यांना सगळं केंद्र सरकार देतं. जवळपास ८८ लाख लोक अन्न सुरक्षा योजनेत नाहीत पण गरीब आहेत. २०११ मध्ये झालेल्या चुकीच्या सर्व्हेमुळे महाराष्ट्रात अन्न सुरक्षा योजनेत आले नाहीत. खरा दिलासा त्यांना द्यायला हवा होता. पण सरकारने त्यांच्यासाठी कोणतीही घोषणा केली नाही,” असं फडणवीसांना सांगितलं.

“सरकारने पदविक्रेत्यांना मदत करु असं सांगितलं आहे. नोंदणीकृत असा उल्लेख केल्याने याचा उपयोग फक्त मुंबई आणि ठाण्यापुरता होणार आहे. याशिवाय रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना परवानगी दिली आहे. संचारबंदी लावल्याने त्यांच्याकडे येणार कोण? पार्सल देण्याची त्यांच्याकडे काय व्यवस्था आहे…असती तर त्यांनी हॉटेलच उघडलं असतं,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ऑक्सिजनचं व्यवस्थापन  करण्यात सरकार अपयशी होत असून त्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

“मुंबई आणि पुणे ही आपली महत्वाची शहरं आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पण मुंबई-पुण्याच्या बाहेरही महाराष्ट्र आहे हे या सरकारला माहितीच नाही. त्यामुळे नागपूर, नाशिक, औरंगाबाद येथे आरोग्य व्यवस्था वाढवण्यासंदर्भात सरकारकडून कोणतीच कृती होताना दिसत नाही. गेल्यावेळीही नागपूरला कोणती व्यवस्था केली नाही, आजही नागपूरची स्थिती वाईट आहे त्यामुळे आलो आहे. जितकी शक्य तितकी मदत करणार आहे. पण सरकार कोणतीही मदत किंवा पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेताना दिसत नाही,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2021 10:22 am

Web Title: bjp devendra fadanvis on maharashtra cm uddhav thackeray lockdown janta curfew sgy 87
Next Stories
1 “मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा अभ्यास केलात तर बरं होईल”
2 ३० टन प्राणवायूची गरज
3 डहाणू शहरातील पश्चिम भागात पाणीटंचाई
Just Now!
X