राज्य सरकार दबावाखाली काम करतंय का अशी शंका असून बदल्या करणं हा एकमेव धंदा करतंय असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. विदर्भातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रुग्णालयांमधील उपचार खर्चावरील दरांवर नियंत्रण आणण्यासंबंधी विचारलं असताना सरकार दबावाखाली काम करतंय का अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

“संपूर्ण शासन फक्त बदल्यांच्या मागे लागलं आहे. बदल्या करणं हा एकमेव धंदा शासनात चालला आहे. बदल्या महत्त्वाच्या आहेत पण एखाद्या वर्षी नाही केल्या म्हणून काही फरक पडत नाही. बदल्यांचा एका वर्षाचा खर्च ५०० कोटींच्या घरात जातो. करोना संकट असताना या बदल्या केल्या नसत्या तरी चाललं असतं. पण मंत्री, प्रशासन सगळेजण कोणाला कशी पोस्टिंग मिळणार, कुठे बदली होणार यात गुंग आहेत,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आणखी वाचा- “दिवसेंदिवस स्थिती आणखी विदारक होत चालली आहे,” फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

“बदल्या दरवर्षी होत असतात पण आमच्या काळात करोना नव्हता. जर आमच्या काळात करोना असता आणि बदल्या झाल्या असत्या तर बोट दाखवता आलं असतं. बदल्यांचा भत्ता देण्यासाठी ५०० कोटी लागतात. येथे पगार देण्यासाठी पैसे नाही आणि मग बदल्या कशाला सुरु आहेत?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आणखी वाचा- श्रीमंत लोक लक्षणं नसताना आयसीयू बेड अडवतात – राजेश टोपे

“नागपुरात आता करोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. आता हळूहळू मृत्यूदेखील वाढत असून चिंताजनक आहे. त्यामुळे नागपुरला आयसोलेशन धोरण आखण्याची गरज आहे. जास्तीत जास्त चाचण्या करुन आयसोलेशन करण्याची गरज आहे. यामुले मृ्त्यू संख्येवर नियंत्रण आणता येईल. गेल्या दौऱ्यात मी अधिकाऱ्यांसी यासंबंधी चर्चा केली होती. आता हे धोरण आक्रमकपणे राबवण्याची गरज आहे,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे.

आणखी वाचा- देशातील प्रत्येक चौथा रुग्ण महाराष्ट्रातील; २५ हजार जणांचा मृत्यू

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवर बोलताना फडणवीस यांनी सांगितलं की, “गंभीर परिस्थिती असून मीदेखील त्याची माहिती घेतली. तरुण पत्रकाराचा अशा पद्दतीने मृत्यू होणं अंतर्मुख करणारं आहे. याकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजे”.