रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात आणलेल्या हक्कभंग प्रस्तावावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना शिवसेनेवर टीका केली आहे. दुटप्पी भूमिका घेऊ शकत नाही असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला आहे. विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन संपलं असून यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख नीट केला नाही तेव्हा हक्कभंग आणतो त्याचवेळी सामनासारख्या दैनिकात राज्यपालांचा उल्लेख कसा होतो, पंतप्रधानांचा उल्लेख कसा होतो याचाही विचार करण्याची गरज आहे. दुटप्पी भूमिका असू शकत नाही, सारखी भूमिका घेतली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
विधिमंडळात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव
“अधिवेशन लवकरात लवकर कसं संपेल तसंच पुरवणी मागण्यांवर कमीत कमी चर्चा व्हावी यासाठी सत्ताधारी पक्षाकडून प्रयत्न करण्यात आले. विरोधी पक्षातून १० ते १२ लोक बोलणार होते. पण एकच भाषण झालं आणि त्यालाही उत्तरं देण्यात आली नाहीत. ज्या प्रकारे करोना वाढत आहे त्यावरील उपाययोजना सांगण्यात आल्या नाहीत,” असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.
“मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत १४ हजार अधिक मृत्यू झाले आहेत.सरकार केवळ सात हजार मृत्यू झाल्याचं सांगत असून मग उर्वरित साडे सात हजार मृत्यू कुठचे आहेत? अद्यापही साडे पाचशे मृत्यू घोषित केलेले नाहीत. राज्य सरकारनं उर्वरित महराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं असून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा,” आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. शेतकरी, पुराच्या मुद्द्यावर सरकार गप्प असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं.
“या अधिवेशनाने सामान्य, गरीबांच्या तोंडाला पानं पुसली आहेत. आम्ही अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सहकार्याची भावना ठेवली. मात्र सत्तारुढ पक्षाकडून फक्त राजकारण करण्यात आलं. कोणत्याही घटकाला दिलासा या अधिवेशनातून मिळालेला नाही,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
माझे कुटुंब,माझी जबाबदारी योजनेवर बोलताना ते म्हणाले की, “आपापल्या कुटुंबाची जबाबदारी आपण घेऊ. पण सरकार काही जबाबदारी घेणार आहे की नाही? दवाखान्यात बेड्स नाहीत, रुग्णवाहिका, व्हेटिंलेटर मिळत नाहीत. अनेक लोकांना जीव गमवावा लागत असून त्यांची जबाबदारी कोण घेणार ? संपूर्ण महाराष्ट्र ज्यांचं कुटुंब आहे ते सरकार मात्र जबाबदार घेणार नाही. ते हात झटकतील. असं कसं चालेल…आम्ही या मोहिमेतही सहकार्य करु. पण कमतरता दूर करण्याचं काम सरकारने केलं पाहिजे”.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2020 7:26 pm