महाविकास आघाडी सत्तेसाठी नव्हे तर सत्तेचे लचके तोडण्यासाठी तयार झाली आहे. प्रत्येकजण सरदार असल्यासारखा वागत आहे. जितके लचके तोडता येतील तेवढे तोडत असून नाही तोडता आले तर एकमेकांचे लचके तोडा अशी अवस्था आहे अशी टीका विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही टीका केली आहे.

“राजकारण आपलं होतं मात्र जीव जनतेचा जातो”, उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

मुख्यमंत्र्यांना टोला

मुख्यमंत्र्यांनी काही पक्ष आंदोलन करुन राजकारण करत असल्याची टीका केली आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, “समोरच्यांना बोलायच्या ऐवजी आपल्या सोबतच्यांना, आपल्या पक्षातील लोकांना पहिलं शिकवावं आणि मग आम्हाला सांगावं”.

करुणा शर्मा पिस्तूल प्रकरणावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

उद्धव ठाकरेंनी काय म्हटलं होतं –

उद्धव ठाकरे यांनी माझा डॉक्टर परिषदेत बोलताना विरोधकांना सुनावलं होतं. मंदिरं उघडण्याच्या आंदोलनांवरुन टीक करताना ते म्हणाले होते की, “अनेकांनी राज्यात मंदिरं उघडा या मागणीसाठी आंदोलनं केली. तुम्ही आंदोलनं करा, अवश्य करा. पण करोनाविरुद्ध आंदोलन करा. आपण राजकारण करतो आणि त्यात जीव मात्र सामान्य जनतेचा जातो. हे चुकीचं आहे. असं व्हायला नको”.

करुणा शर्मा पिस्तूल प्रकरणी चौकशी व्हावी

“यासंदर्भात सखोल चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, त्यापासून कोणाला वंचित ठेवण्याचं कारण नाही. त्या ठिकाणी जे काही घडलं आहे त्यावरुन कायदा-सुव्यवस्था कशी राखली जात आहे हे स्पष्ट होत आहे. जे आरोप प्रत्युत्तर होत आहेत आणि मिळालेलं पिस्तूल हे गंभीर असून यासंदर्भात कोणत्याही दबाबाशिवाय चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

अनिल देशमुखांनी चौकशीला सामोरं जावं

“मलादेखील माध्यमांकडूनच ईडीने लूकआऊट नोटीस काढली असल्याची माहिती मिळाली. आता उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय असा सर्व प्रवास झाला असल्याने त्यांनी आता कायद्याच्या दृष्टीने चौकशीला सामोरं जावं; तेच योग्य ठरेल,” असा सल्ला यावेळी त्यांनी अनिल देशमुख यांना दिला.