राज्यसभेच्या उपसभापतींची भूमिका सदनाच्या प्रतिष्ठेची आणि त्या पदाचा प्रचंड अवमूल्यन करणारी आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तसंच सदस्यांनी केलेल्या अन्नत्याग उपोषणाला पाठिंबा देत एक दिवसाचे अन्नत्याग करत असल्याचं जाहीर केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

मी आज दिवसभर अन्नत्याग करणार – शरद पवार

देवेंद्र फडणवीस नागपुरात करोनासंबंधी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पोहोचले होते. एम्स आणि मेयो रुग्णालयाला त्यांनी भेट दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना शरद पवारांनी खासदाराच्या निलंबनाला विरोध केल्यासंबंधी विचारण्यात आलं. तेव्हा ते म्हणाले की, “शरद पवारांनी पत्रकार परिषदेत विधेयकाला कुठेही विरोध केलेला नाही. त्यांनी काल जी कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईच्या निमित्ताने विरोधी पक्षाला समर्थन दिलं. पण मला असं वाटतं की राज्यसभेतील सदस्य असंशोभनीय वागले नसते तर आज पवार साहेबांना उपवास घोषित करावा लागला नसता. त्यांचं वागणं अशोभनीयच होतं. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही”.

शरद पवारांनी काय म्हटलं?
निलंबित करण्यात आलेल्या सदस्यांनी अन्नत्याग केला आहे. त्यांना समर्थन म्हणून आपणदेखील त्यांच्यात सहभागी होत आज दिवसभर अन्नत्याग करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं. “राज्यसभा सदस्यांना निलंबित करुन त्यांचे अधिकार काढून घेण्यात आले. सदस्यांनी आत्मक्लेष करण्यासाठी उपोषण सुरु केलं असून आपल्या मनातील भावना सभागृहाबाहेर व्यक्त केल्या. आश्चर्याची बाब म्हणजे उपासभापतींनी नियमांना महत्त्व न देता, सदस्यांचे अधिकार नाकारले आणि उपोषण करणाऱ्या सदस्यांना चहा देण्याचा प्रयत्न केला. सदस्यांनी चहाला हात लावला नाही हे बरंच झालं,” असं शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, निवडणूक पत्राबाबत मागितलं स्पष्टीकरण
कृषी विधेयकांवरुन राज्यसभेत झालेल्या गोंधळावर शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शरद पवारांनी यावेळी राज्यसभा उपसभापतींवर तसंच कृषी विधेयकं संमत करण्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली. “सभागृहात दोन ते तीन दिवस चर्चा होण्याची अपेक्षा असते. पण ही विधेयकं तातडीने मंजूर करावी असा सत्ताधारी पक्षाचा आग्रह होता असं दिसत आहे. सदनाचं काम रेटून पुढे नेण्याचा प्रयत्न असावा असं दिसत होतं,” अशी टीका शरद पवार यांनी केली.