News Flash

शरद पवारांच्या साताऱ्यातील ‘त्या’ वादळी सभेवरुन फडणवीसांचा टोला; म्हणाले…

फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साताऱ्यात भर पावसात घेतलेली सभा आजही राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय आहे. शरद पवारांनी घेतलेल्या त्या सभेमुळे साताऱ्यात चित्रं बदललं आणि उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान पुन्हा एकदा ही सभा चर्चेत आली आहे. याचं कारण म्हणजे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सभेवरुन टोला लगावला आहे.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपा आणि महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस सोमवारी पंढरपुरात होते. यावेळी त्यांनी एकूण सहा सभा घेतल्या. सभेत बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसंच शरद पवारांच्या सभेचा उल्लेख करत आपल्याला आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही असं म्हणत टोला लगावला.

“मला खासदार निंबाळकर यांनी आता पावसात सभा घेण्याची तुमची वेळ आहे असं सांगितलं. आपल्याला निवडणूक जिंकण्यासाठी पावसात सभा घ्यावी लागत नाही. पण एक गोष्ट निश्चित सांगतो ही निवडणूक एका मतदारसंघाची निवडणूक असली तरी महाराष्ट्रात ही निवडणूक एक नवीन विचार आणि मार्ग घेऊन येणार आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

‘राज्यात करेक्ट कार्यक्रम करून दाखवतो’
“सर्व घटकांवर अन्याय करणारं हे सरकार आहे. या सरकारचे १०० अपराध भरले आहेत. १०० अपराधानंतर पहिली संधी पंढरपूरच्या जनतेला, नागरिकांना मिळाली आहे. या निवडणुकीत यांचा कार्यक्रम करा, मी राज्यात यांचा कार्यक्रम करून दाखवतो. या निवडणुकीत समाधान आवतडे यांच्या रुपाने तुम्ही मला एक आमदार दिलात तर यांचा मी करेक्ट कार्यक्रम केला म्हणून समजा. त्याची चिंता तुम्ही करु नका,” असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.

संजय राऊतांना टोला
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये करोना काळातही राष्ट्रवादी काँग्रेसने मोठमोठ्या सभा घेतल्याने आम्हालाही प्रचार करण्यासाठी सभा घ्याव्या लागल्या असा युक्तिवाद देवेंद्र फडणवीस यांनी केला. करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राष्ट्रवादीप्रमाणेच भाजपानेही मोठ्या सभा घेतल्या या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी समर्थन केलं. “करोना काळात केंद्र सरकारने राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात मदत केली. राज्याला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिल्याने आज देशात नंबर 1 चे लसीकरण महाराष्ट्र राज्यात झाले. मात्र मुख्यमंत्री विरोधी पक्षाला राजकारण करू नका म्हणून सांगतात आणि त्यांच्याच पक्षाचे कोणीही सोम्यागोम्या उठतो आणि विरोधी पक्षावर टीका करतो,” अशी बोचरी टीका देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 8:11 am

Web Title: bjp devendra fadanvis pandharpur rally ncp sharad pawar sgy 87
Next Stories
1 करोना स्थिती हाताळण्यात सरकार अपयशी – फडणवीस
2 तणनिर्मूलन, कापूस वेचणी आता यंत्रमानवाद्वारे!
3 महिलांसाठीच्या प्रतिकूल क्षेत्रांचा उल्लेखच नाही!
Just Now!
X