राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राज्य सरकारने तसे कुठलेही आदेश दिलेले नव्हते असं माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची राजकारणातील विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठाऊक आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे. राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत असंही ते म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींचे फोन टॅप झाल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे की, “राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची राजकारणातील विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठाऊक आहे. राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत. सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठाऊक आहे. शिवसेनेचे मंत्रीसुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच. माझी एकच विनंती आहे की, तात्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी”.

आणखी वाचा – फोन टॅपिंगप्रकरणाची चौकशी होणार; गृहमंत्र्यांचे आदेश

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही बड्या नेत्यांचे फोन आणि व्हॉट्सअॅप टॅप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनीही माध्यमांसमोर काही आरोप केले होते. त्यानंतर आता याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्यांचा कोणाचा यामध्ये सहभाग आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असे प्रकार घडत असतील तर यापुढे सर्वसामान्यांचेही फोन केले जाऊ शकतात. यावर चाप लावणं आवश्यक आहे. सरकार त्या दृष्टीनं नक्कीच प्रयत्न करेल अशी अपेक्षा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले होते.

आणखी वाचा – फोन टॅप हो रहे है, भाजपा मंत्र्याचीच माहिती: संजय राऊत

तर संजय राऊत यांनीदेखील फोन टॅपिंगची आपल्याला कल्पना होती, असं म्हटलं आहे. “तुमचा फोन टॅप होत आहे, ही माहिती मला भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्यानं दिली होती. जर माझं बोलणं कोणाला ऐकायचं असेल तर त्यांचं स्वागतच आहे. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. मी कोणत्याही गोष्टी लपून करत नाही. ऐका माझं बोलणं,” अशा आशयाचं ट्विट राऊत यांनी केलं आहे.