हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हक्कभंगाच्या प्रस्तावाचा मुद्दा मांडत कंगना आणि अर्णब गोस्वामी यांचा उल्लेख केला असून यानिमित्ताने ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. कंगना आणि अर्णबच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलं. सोशल मीडियावर या सरकारविरोधात एकही वाक्य लिहिलं तर तुम्हाला अटक झाल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती आहे अशी टीका यावेळी त्यांनी केली.

“अर्णब गोस्वामी किंवा कंगना रणौत असतील आम्ही त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी रेकॉर्डवर सांगतोय की आमच्या मुख्यमंत्र्यांचा उल्लेख योग्यच केला पाहिजे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेखही योग्यच झाला पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विरोधी पक्षनेत्याचा उल्लेख कसाही केला तरी तो सक्षम आहे असा चिमटाही त्यांनी काढला.

“फडणवीस योग्य भूमिका मांडत आहेत,” विधानसभा अध्यक्षांनी वाढीव वीज बिलावरुन खडसावलं

“कायद्याच्या राज्यात प्रत्येक गोष्टीला कायद्याने उत्तर द्यायचं असतं. एखाद्याने चूक केली तर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे. पण आमच्याविरोधात बोललं तर पोलिसांचा वापर करु असं सुरु आहे. सोशल मीडियावर या सरकारविरोधात एकही वाक्य लिहिलं तर तुम्हाला अटक झाल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती आहे.” अशी टीका यावेळी त्यांनी केली.

“आमच्यावेळी विरोधात लिहिलं म्हणून कोणाला जेलमध्ये टाकलं नाही. सोशल मीडियावरील अनेक लोकांना नोटीस पाठवून एक सत्र सुरु आहे. मुस्कटबाजी सुरु आहे. माझं, सुधीर मुनगंटीवार आमचं कार्टून आलं त्यावर गलिच्छ लिहिलं त्यावर कारवाई नाही,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. “अर्णब गोस्वामी चुकीचं वागत होते, ५० कायदे आपल्याकडे आहेत. ज्याच्या माध्यमातून कारवाई केली जाऊ शकत होती. पण यांनी बंद झालेली केस ओपन केली,” असा आरोप फडणवीसांनी केला. यावेळी त्यांनी सत्ताधारी नेत्यांना सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वाचा असं सांगत हायकमांड म्हणजे सुप्रीम कोर्ट नाही असं सुनावलं. फडणवीसांनी यावेळी सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णयही वाचून दाखवला.

…तर भाजपा रस्त्यावर उतरेल, फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला इशारा

दरम्यान शिवेसना आमदार अनिल परब यांनी फडणवीसांना सभागृहात खटला चालवू नका असं सांगत विरोध दर्शवला. अर्णब गोस्वामी यांच्यावर दाखल झालेला गुन्हा सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला नाही असं ते म्हणाले. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी विरोध केला असता यावेळी सभागृहात गोंधळ झाला. यामुळे विधानसभा अध्यक्षांना मध्यस्थी करावी लागली.

“चुकीचं सांगण्याची मला हौस नाही. सत्ता डोक्यात जाता कामा नये. हा दुरुपयोग आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयातून आपण काही शिकणार आहोत की नाही,” अशी विचारणा फडणवीसांनी यावेळी केली. “मी पुन्हा सांगतो की सन्माननीय उद्धव ठाकरेजी, माननीय मुख्यमंत्री किंवा सन्माननीय आदित्य ठाकरेजी यांच्याबद्दल अर्णब गोस्वामी जे बोलले ते मला मान्य नाही. ते चुकीचं आहे. असं बोलण्याचा अधिकार नाही,” याचा फडणवीसांनी पुनरुच्चार केला.

“अर्णब गोस्वामीने माझ्याविरोधातही ट्रायल चालवलं होतं. तीनवेळा चालवलं होतं. एकदा तर मी अमेरिकेत असताना गुंतवणूकदारांची भेट घेत असताना ते कॅमेरे वेगळंच काम करत होते. याचा अर्थ भारतात आल्यावर मी त्यांना जेलमध्ये टाकलं नाही. तर भारतात येऊन उत्तर दिलं. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्या देशात कायदा आहे,” असं फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

“कंगनाने जे ट्विट केलं त्याला आमचं समर्थन नाही. ते चुकीचं आहे. पण कायद्याचं राज्य आहे. कोणी तुमच्याविरोधात बोललं तर अब्रनुकसानी केल्यामुळे जेलमध्ये टाका. तुमच्या मनात येईल तसं घर तोडता येत नाही. हे कायद्याचं राज्य आहे, पाकिस्तान नाही. हुकूमशाही नाही तर लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला अधिकार आहे, जो अधिकाऱाच्या पलीकडे गेला त्याला कायदा आहे. कायद्याने कारवाई करा,” असं ते म्हणाले.