कोकण किनारपट्टीला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर अवघ्या वर्षभरातच पुन्हा कोकणातील सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांना तौते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादळाचा तडाखा बसलेल्या रायगड जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागातील नागरिकांना तातडीने भरघोस मदत मिळावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. “निसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. सरकारने तातडीने त्यांना भरघोस नुकसान भरपाई द्यायला हवी”, असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं आहे. रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

७० हजार घरांना अजूनही वीजपुरवठा नाही!

दरम्यान, रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनी झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. “रायगडमध्ये जे नुकसान झालंय, त्याचा आढावा आम्ही घेतला आहे. जवळपास ८ ते १० हजार घरांचं नुकसान झालंय. विशेषत: ५ हजार हेक्टरमध्ये फळपिकांचं नुकसान झालं आहे. उन्हाळी तांदूळ, इतर फळपिकांचं नुकसान झालंय. जवळपास २०० शाळांचं नुकसान झालं आहे. २५ वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या इमारतींचं, वीजपुरवठ्याचं मोठं नुकसान झालं आहे. अजूनही १७२ गावांमध्ये ७० हजार घरं अशी आहेत ज्यांना वीज पूर्ववत झालेली नाही. विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. ४ मृत्यू या वादळामुळे रायगडमध्ये झाले आहेत. बोटींचं नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे. त्यांचाही पंचनामा करावा लागेल. कोळी बांधवांचं म्हणणं आहे की निसर्गवेळी झालेल्या नुकसानीचे पैसे अजून मिळाले नाहीत. आता हे दुसऱ्यांदा नुकसान झालंय. त्यामुळे तात्काळ नुकसानभरपाईची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

Congress Toolkit : काँग्रेसकडून प्रत्येक वेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते? – देवेंद्र फडणवीस

‘निसर्ग’ चक्रीवादळावेळच्या घोषणांचं काय झालं?

“मला वाटतं की पंचनामे ही एक पद्धत असते. पण सरासरी आपल्यासमोर किती नुकसान आहे त्याचा अंदाज येतो. त्यानुसारच राज्य सरकार नुकसानभरपाईची घोषणा करत असतं. निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारने काही घोषणा केल्या होत्या. पण तीही मदत मिळालेली नाही. तेव्हा पूर्ण वाड्या उन्मळून पडल्या होत्या. त्यावेळी मदतीची अपेक्षा होती. पण ती मिळाली नाही. प्रतिझाड ५० ते १०० रुपये अशी मदत मिळाली आहे. आता हा दुसरा झटका आहे. एकीकडे लॉकडाऊन, करोनामुळे व्यवसाय ठप्प आहेत. वर्षभरातच दुसरा झटका लोकांना बसला आहे. काही जिल्ह्यांनाच याचा फटका बसला आहे. त्यामुळे सरकारवर याचा फारसा बोजा देखील पडणार नाहीये. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की सरकारने भरघोस मदत करायला हवी”, असं ते म्हणाले आहेत.

हापूस आंब्यावर ‘तौते’ची झडप!

पहिल्या हंगामात फारसे उत्पादन नसल्यामुळे शेवटच्या हंगामावर भिस्त ठेवलेले कोकणातील आंबा बागायतदार तौक्ते चक्रीवादळात पूर्णत: होलपटले गेले आहेत. चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधील आंबा बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाच, पण उत्पन्न देणारी झाडेही उन्मळून पडली आहेत. या दुहेरी अस्मानी संकटामुळे बागायतदारांचे १०० कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. मेच्या दुसऱ्या आठवडय़ापासून खऱ्या अर्थाने शेवटच्या हंगामातील हापूस आंबा काढून मुंबई, पुण्याच्या बाजारात पाठविला जात असल्याने बागायतदारांना उत्पन्नाची संधी असते, मात्र शेवटच्या हंगामातील हापूस घाऊक बाजारपेठेत पाठविण्याच्या काळातच चक्रीवादळाने तडाखा दिल्याने बागायतदारांचे सुमारे १०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.