किसान काँग्रेसने नोंदवला आक्षेप

यवतमाळ : पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर असताना ज्यांनी शेतकऱ्यांचे अतोनात हाल केले, त्यांच्या आयुष्याची होळी केली ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का, असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार यांनी उपस्थित केला आहे.

युतीच्या सत्ताकाळात विविध अटी व शर्ती लादून शेतकऱ्यांना कोणत्याही योजनेचा योग्य लाभ होऊ दिला नाही. तेच देवेंद्र फडणवीस आता त्यांनीच निर्माण केलेल्या समस्यांवर बोलत आहेत, असे पवार म्हणाले. विदर्भात गंभीर दुष्काळी परिस्थिती असताना दुष्काळ जाहीर करण्यासाठी उच्च न्यायालयात जावे लागले. न्यायालयाने आदेश देऊनही सरकारने शेतकऱ्यांना मदत दिली नाही. त्यामुळे आता फडणवीसांना अचानक शेतकऱ्यांचा पुळका का आला, असा प्रश्न पवार यांनी विचारला आहे. भाजप सरकारने दिलेली कथित कर्जमाफी शेतकऱ्यांच्या आयुष्यातील संकटकाळ होती. त्यावेळी अखेपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. कमीत कमी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी असाच त्या योजनेचा आराखडा होता, असा आरोप पवार यांनी केला आहे. सध्याचे महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काहीतरी खुसपट काढून सरकारवर टीका करत आहेत, असे पवार यांनी म्हटले आहे. राज्यात भाजपचे सरकार नसल्याने केंद्र सरकारही महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत आहेत.

फडणवीसांना शेतकऱ्यांचा खरोखरच कळवळा असेल तर त्यांनी केंद्राकडे दुष्काळी मदतीसाठी पाठपुरावा करून राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळवून द्यावी, असे आवाहनही देवानंद पवार यांनी केले आहे.