भाजपचे जिल्हाध्यक्ष निवडताना पन्नाशीच्या आतील कार्यकर्त्यांस प्राधान्य तसेच खासदार किंवा आमदार असलेल्या नेत्यास जिल्हाध्यक्षपद देऊ नये, अशा स्वरूपाच्या काही सूचना सर्व जिल्हाशाखांना देण्यात आल्याची माहिती गुरुवारी येथे मिळाली.

राज्यातील सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला देशाच्या राजधानीत निर्णायक वळण लागले असताना भाजपात पक्षांतर्गत निवडणुकांची प्रक्रिया गतिमान झाली असून मराठवाडय़ातील सर्व जिल्हाध्यक्षांसह मंडळ अध्यक्षांची महत्त्वपूर्ण बठक सोमवारी औरंगाबादेत पार पडली. पक्षाचे संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी या बठकीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या किंवा त्या उंबरठय़ावर असलेल्या नेत्यांना लोकसभा-विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न देण्याचे धोरण पक्षाने यंदा राबविले. त्यानंतर आता पक्षसंघटनेत महत्त्वाचे मानले जाणारे जिल्हाध्यक्षपद तरुण, कार्यक्षम व्यक्तीकडे असावे, अशी पक्षाची योजना आहे.

मागील काळात काही जिल्ह्यंमध्ये खासदार व आमदार असलेल्या नेत्यांनी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. मराठवाडय़ात िहगोलीचे विधानसभा सदस्य तान्हाजी मुटकुळे, नांदेडचे विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर हे सध्या जिल्हाध्यक्ष आहेत; पण एक व्यक्ती एक पद या धोरणानुसार त्यांना आता जिल्ह्यच्या पक्षसंघटनेतून मुक्त केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

भाजप पक्षसंघटना निवडणुकीच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यतील अंतर्गत वाद गेल्या आठवडय़ात उघड झाला. खासदार आणि दोन आमदारांनी मंडळ अध्यक्षांच्या निवडीच्या प्रक्रियेसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची यादी तयार करून वर पाठविली होती; पण ही यादी बाद करून जिल्हाध्यक्षांकडून सादर झालेल्या यादीला मान्यता देण्यात आली.

औरंगाबादचे डॉ. भागवत कराड यांना नांदेड जिल्ह्यतील निवडणूक प्रक्रियेचे प्रमुख करण्यात आले आहे. पक्षाने क्रियाशील सभासद नोंदणीसाठी २४ नोव्हेंबपर्यंत मुदत वाढवतानाच मंडळ अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक अधिकारी निश्चित केले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे – किनवट-राजेश महाराज देगलूरकर, माहूर-प्रसाद डोंगरगावकर, हिमायतनगर-प्रवीण गायकवाड, हदगाव-किशोर पाटील लगळूदकर, मुखेड-राजू गंदीगुडे, देगलूर-अशोक नेमानीवार, कंधार-मारोती वाडेकर, भोकर-रवी पाटील खतगावकर, लोहा-रवींद्र पोतगंटीवार, मुदखेड-शंकर काळे, नायगाव-लक्ष्मण ठक्करवाड, उमरी-केरू सावकार बिडवई, धर्माबाद-माधव उच्चेकर, कंधार-बाळू कऱ्हाळे.

या यादीवर जिल्हाध्यक्षांचा वरचष्मा असल्याचे काही तालुकाध्यक्षांचे म्हणणे आहे. खासदारांच्या यादीतील अशोक पाटील मुगावकर व इतर काही नावे गळाली; पण अर्धापूरमध्ये त्यांनी सुचविलेले नाव घेण्यात आले.

जिल्हाध्यक्षपदासाठी बापूसाहेब गोरठेकर यांचे नाव वयोमर्यादेच्या बंधनामुळे बाद झाले. क्रियाशील सदस्य होऊन तीन वष्रे पूर्ण होण्याचा एक निकष असल्यामुळे शिवराज होटाळकर यांनाही प्रतीक्षा करावी लागणार आहे. इतर काही नावांची चर्चा होत असताना नायगावचे जुने-धडाडीचे कार्यकत्रे बालाजी बच्चेवार यांचे नाव आता पुढे आले. ते सर्व निकषांमध्ये बसणारे आहेत, असे सांगण्यात आले. या संदर्भात पक्षाच्या एका जबाबदार सरचिटणीसांकडे विचारणा केली असता, औरंगाबादच्या बठकीतील अधिक तपशील देण्याचे त्यांनी टाळले.