काँग्रेसचे माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी राष्ट्रीय समाज पक्षात पक्षाध्यक्ष महादेव जानकर यांच्या उपस्थितीत नुकताच प्रवेश केला. मात्र, या प्रवेशाच्या सभेतच जानकर यांनी अहमदपूरची जागा महायुतीत रासपलाच मिळणार असल्याचे जाहीर केल्यामुळे भाजपच्या गोटात चांगलीच अस्वस्थता पसरली आहे.
अहमदपूर मतदारसंघाचे भाजप आमदार भगवानराव नागरगोजे व आमदार बब्रुवान खंदाडे यांनी प्रतिनिधित्व केले होते. भाजपची हक्काची जागा म्हणून अहमदपूरकडे पाहिले जाते. भाजपकडे सर्वाधिक इच्छुकांची गर्दीही याच मतदारसंघात आहे. काँगेसचे माजी मंत्री पाटील यांनी मागील निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती. मात्र, रिडालोसचे बाबासाहेब पाटील यांच्याकडून त्यांचा निसटता पराभव झाला. बाबासाहेब पाटील आता राष्ट्रवादीत दाखल झाल्यामुळे आघाडीतून उमेदवारी मिळणे अवघड झाल्याचे लक्षात आल्यानंतर विनायकराव पाटलांनी रासपत प्रवेश केला. महायुतीची अजून जागांबाबत नेमकी भूमिका स्पष्ट झाली नाही. मात्र, जानकर यांनी अहमदपूर जागेवर दावा सांगितल्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. गणेश हाके, बब्रुवान खंदाडे, अशोक केंद्रे, दिलीप देशमुख यांच्यासह अनेक कार्यकत्रे पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करीत आहेत.