चिपळूण : भाजप हा राष्ट्रीय पक्ष असला तरी पदवीधर मतदारसंघासाठी त्यांच्याकडे उमेदवार नाही. त्यामुळे इतर पक्षातून भाजपला उमेदवार आयात करावा लागला, अशी टीका राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातील  शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे यांच्या प्रचारासाठी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी येथे कार्यकर्त्यांचा  मेळावा आयोजित करण्यात आला.  या वेळी ते म्हणाले की,  राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या या उमेदवाराने पाच वर्षांत काहीच केले नाही. भाजप नेत्यांचे फोटो जाहीरनाम्यात वापरले तर मते मिळणार नाहीत. म्हणून भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो वापरून मतदारांना आकर्षति करण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजपला पराभव दिसू लागल्यामुळे नेत्यांकडून असे कृत्य सुरू झाले आहे.

कोकण पदवीधर मतदार संघाची निवडणूक शिवसेनेने यापूर्वी कधीही लढवली नाही. मित्र पक्षाचा उमेदवार आमच्या मदतीवरच निवडून येत होता, असा दावा करून शिंदे म्हणाले की,  यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचून त्यांना शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान करण्याचा आग्रह करा. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान उमेदवाराने सहा वर्षांत काहीच केले नाही. त्यामुळे निवडणुकीत शाळा-महाविद्यालयातील शिक्षकांना व शैक्षणिक संस्थांना भेटवस्तू देऊन मते मिळवण्याचा प्रयत्न चालू  आहे, असाही आरोप शिंदे यांनी केला.

चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण, संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख सचिन कदम, माजी आमदार बापू खेडेकर इत्यादींनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.

शिक्षक-पदवीधरांचे प्रश्न शिवसेना सोडवणार

मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत शिंदे म्हणाले की, भाजप सरकारकडून शिक्षकांवर अन्याय होत आहे. अडचणीच्या व लांबच्या ठिकाणी त्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. अन्यायकारक बदल्या थांबविण्याची मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केल्यानंतर त्यांनी या विषयात लक्ष घातले. शिवसेना यापुढे शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

भाजप सरकार शिक्षक, मुख्याध्यापक आणि बेरोजगार पदवीधारकांच्या विरोधात आहे. त्यांना अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत, असा आरोप करून शिंदे म्हणाले की, शिवसेना सरकारमध्ये आहे. मात्र भाजपाने सामान्य जनतेच्या विरोधातील निर्णय घेतले त्या प्रत्येक वेळी शिवसेना जनतेच्या बाजूने राहिली आहे. सरकारच्या अशा प्रत्येक निर्णयाला आम्ही विरोध केला आहे. यापुढे कोकणातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि बेरोजगार पदवीधरांचे प्रश्न हाती घेवून शिवसेना काम करणार आहे. अन्यायकारक बदलीच्या निर्णयामुळे    राज्यातील शिक्षक त्रस्त झाले आहेत. काहीजण आमच्याकडे आले, तर काहीजण शिक्षणमंत्र्यांकडे गेले. शिक्षणमंत्र्यांनी केवळ संघटनांच्या बठका घेतल्या. निर्णय काहीच घेतले नाहीत. आमच्याकडे ज आलेल्या शिक्षकांचे प्रश्न समजून घेवून मी ते सोडवण्याची ग्वाही दिली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांना हा विषय सांगितले. दोन दिवसापूर्वी झालेल्या कॅबिनेटच्या बठकीत या विषयावर मी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या विषयात लक्ष घातले.