गेल्या दहा बारा वर्षात जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत असं म्हणत भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, “निव्वळ मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का ? कोणत्या कारणासाठी ? याचा शोध मी घेत आहे. मेहनत आणि कष्टाने आम्ही महाराष्ट्रात भाजपाचं एकट्याच्या बळावर सरकार आणलं होतं. त्या कालखंडात आत्ता आहेत त्यातील अनेक लोक नव्हतेसुद्धा. हे अलीकडे १०-१२ वर्षात जन्माला आलेले राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवत आहेत.”.

“मी गेल्या चाळीस वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ आहे. पण पक्षाने माझ्यावर अन्याय केल्याची भावना आहे. महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्यांमध्ये एक संताप आहे. या संतापाचं कधी एकत्रीकरण होऊन स्फोट होईल हे सांगता येत नाही,” असंही खडसे यांनी म्हटलं आहे. करोनाचं सावट दूर झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.